spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राऊतांनी इंडी आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका

मुंबई :- संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून इंडी आघाडीतील बेबनाव सर्वांसमोर मांडत इंडी आघाडीची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली आहेत. इंडी आघाडी ही विचारांची नव्हे तर केवळ सत्तेसाठी झालेली आघाडी आहे त्यामुळे इंडी आघाडीची मोट बांधायचा कितीही आटापिटा केला तरी तो असफलच होणार अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. इंडी आघाडीकडे कुठलाही अजेंडा नसून भाजपा विरोध हाच एकमेव अजेंडा असल्याने देशातील मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले आहे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बन म्हणाले की, आगामी काळात इंडी आघाडीच्या अजून ठिक-या उडणार आहेत. इंडी आघाडीच्या नेतृत्वावरून इंडी आघाडीमध्ये एकमत होत नाही अशी दयनीय स्थिती आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव इंडी आघाडीच्या नेतृत्वासाठी राऊतांनी लावून धरावे म्हणजे महाराष्ट्रात जसा भोपळा हाती आला तसाच भोपळा इंडी आघाडीला देशभरात हाती लागल्याशिवाय राहणार नाही अशी खिल्ली त्यांनी उडवली.

विधानसभा निवडणुकीत मोठमोठे दावे करत महाविकास आघाडी एकत्रच लढली होती तरीही ‘मविआ’ च्या घटक पक्षांना धोबीपछाड देत भाजपा महायुती सत्तेत आली हे राऊत विसरले असे म्हणत बन यांनी शरसंधान साधले. विधानसभेला उबाठा गटाने 90 जागा लढून हाती केवळ 20 जागा मिळाल्या, तीच गत सर्व घटक पक्षांची झाली. याउलट विधानसभेला एकट्या भाजपा 137 जागा जिंकून नंबर एक चा पक्ष ठरला होता. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठीही झुंडीने सर्व पक्ष एकत्र येऊन लढले असते तरी मतदारांनी भाजपा महायुतीलाच कौल दिला असता असे बन म्हणाले.

राहुल यांच्या नेतृत्वाची धास्ती काँग्रेसला आहे -भाजपाला नाही

इंडी आघाडीचे नेतृत्व जर राहुल गांधी यांच्याकडे आले तर त्यांच्या नेतृत्वाची धास्ती सोनिया गांधी, काँग्रेस आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना अधिक आहे. जोपर्यंत राहुल गांधी इंडी आघाडी आणि काँग्रेसचे नेतृत्व करतील तोपर्यंत त्यांना ‘अच्छे दिन’ येणे केवळ अशक्य आहे. 2009 पासून सलग चार वेळा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे रिलॉन्चिंगचा घाट काँग्रेसने घातला होता मात्र हाती धुपाटणे लागले. त्यामुळे राहुल यांच्या नेतृत्वाची भाजपाला नव्हे तर काँग्रेसला अधिक धास्ती आहे.

राज्यसभेची खासदारकी आपल्या पदरात पडावी यासाठी राऊतांना काँग्रेसचा पुळका येत असून काँग्रेसला एकत्र ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत अशी टीका बन यांनी केली. काँग्रेस एकटी राहिली काय किंवा मविआ आणि इंडी मध्ये राहीली काय, फरक शून्य पडणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व असताना सर्व पक्षांचा धुव्वा उडणार हे निश्चित आहे. राहुल यांचे नेतृत्व आणि भरीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नावाचे टिपू सुलतान आगीची कांडी टाकत असल्याने काँग्रेसची गत काय होणार हे सांगण्याची गरज नाही असा हल्लाबोल बन यांनी केला.

ज्यांच्या शब्दकोषात घरबशा आणि घरकोंबडा हे दोनच शब्द आहेत त्यांच्या तोंडी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून चळवळ उभारण्याची, आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही असा घणाघात बन यांनी केला. घरात बसून निवडणुका लढता येत नाहीत हे राऊत आणि उद्धव ठाकरे यांना माहित नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी जे मैदानात उतरले नाहीत त्यांनीच उबाठा गटाला रस्त्यावर आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम खंबीरपणे उभे रहाते असेही ते म्हणाले.

भारत कुणापुढेच शरणागती पत्करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व असताना भारत कधीही गुलाम होणार नाही. देशाच्या समस्या, राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करणारे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार असताना कुणापुढे शरणागती पत्करणार नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.