– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई :- देशातील क्रमांक एक चा पक्ष भारतीय जनता पार्टी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबई सजवत असेल, ठिकठिकाणी फलक लावत असेल तर त्यात गैर काहीच नाही. ‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृती आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारून कोट्यवधींचे करार होत असतील, भारतामध्ये परदेशी गुंतवणूक येत असेल, रोजगार निर्मिती होऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचा प्रयत्न, पंतप्रधान मोदी करत असतील तर संजय राऊत यांचे पोट दुखण्याचे कारण नाही, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईमध्ये स्वागत केले म्हणून लगेच कोणी फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये उतरत नाही असा टोमणा ही बन यांनी मारला.
फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या दौ-यावरून हा पंतप्रधान मोदी यांचा शो आहे असे म्हणत भाजपावर तोंडसुख घेणा-या राऊतांचा समाचार घेत बन म्हणाले की, भारताची मान अभिमानाने जेव्हा जेव्हा उंचावते ते पाहून राऊत अस्वस्थ होतात. महाराष्ट्र जाऊ द्या मुंबईतील मतदारांनीही उबाठा, राऊतांना नाकारले आहे, अशा राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयाबद्दल बोलू नये. पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली जात असून देशाच्या अर्थव्यवस्थेने 11 व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर भरारी घेतली आहे.
या देशामध्ये राहायचे असेल तर ‘वंदे मातरम’ म्हणावे लागेल ‘मोदी मोदी’ म्हणण्याची गरज नाही असे म्हणत श्री. बन यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव 140 कोटी भारतीयांच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे ‘मोदी मोदी’ घोषणा देण्याची गरजच भासत नाही. उबाठा गटाची मुंबई आणि इतर महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदांमध्ये कशी दयनीय अवस्था झाली याचा राऊतांनी विचार करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
अजितदादांबद्दल भंपक कथा सांगू नका
अजितदादांची फाईल कुठे होती, कोणी उघडली होती असल्या भंपक कथा सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी न पडता पत्राचाळ फाइलबद्दल विचार करावा. पत्राचाळ प्रकरणी आपण जामीनावर बाहेर आहात हे राऊतांनी विसरू नये, असेही श्री. बन यांनी खडसावले. काही कागदपत्रे असतील तर पुरावे सादर करावेत. नाहक जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार बंद करावे.
पार्थ पवार प्रकरणात अद्याप अहवाल यायचा असताना, या प्रकरणात कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे त्यामुळे असे व्यवहार होतात असे म्हणणा-या राऊतांवर टीका करत बन म्हणाले की, अजितदादांची बदनामी करण्याचा घाट राऊतांनी घातला आहे. अजितदादांच्या संमतीनेच हा व्यवहार झाला आहे असेच राऊतांना दर्शवायचे असून मृत्यूपश्चात अजितदादांची बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न राऊतांनी त्वरित थांबवावा असा इशाराही त्यांनी दिला.
अजितदादा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्राने बघितला
अजितदादा हे महाविकास आघाडीची साथ सोडून एनडीए सोबत आले होते. मविआ च्या सर्व घटक पक्षांनी अजितदादांना बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न केला होता यामुळेच अजितदादा व्यथित झाले होते. त्यांनी एनडीए भाजपा सोबत येऊन निवडणूका लढवल्या आणि विधानसभा,महापालिका,नगरपालिका आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचाच पक्ष यांवर मतदारांनीही शिक्कामोर्तब केले हे राऊतांनी स्मरणात ठेवावे असेही बन म्हणाले.




