हंसराज, प्रतिनिधी भंडारा साकोली :- वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तरुणांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी साकोली येथे ‘रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा’ मोहिमेतंर्गत भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे दोन नामांकित महाविद्यालयांतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे देण्यात आले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ फार्मसी या दोन ठिकाणी हे मार्गदर्शन सत्र पार पडले. दोन्ही महाविद्यालयांतील प्रत्येकी ३०० अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून भंडारा येथील मोटार वाहन निरीक्षक शेखर आचार्य उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेच्या विविध पैलूंवर तांत्रिक आणि व्यावहारिक माहिती दिली. प्रामुख्याने मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम, ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंग टाळणे यावर भर देण्यात आला. तसेच, अपघाताच्या वेळी जखमींना मदत करणाऱ्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण म्हणजेच ‘राहवीर’ (Good Samaritan) योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
“सुरक्षा ही स्वतःची जबाबदारी”
मार्गदर्शन करताना शेखर आचार्य म्हणाले की, “रस्त्यावरील सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून ती स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. शिस्तबद्ध वाहन चालवल्यास अनेक निष्पाप जीव वाचू शकतात.”
या उपक्रमाला दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली.




