हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत सजगता निर्माण करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), भंडारा यांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा रथ’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २२ जानेवारी रोजी या विशेष रथाचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
वाहतुकीचे नियम न पाळणे, अतिवेग, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर, या रथाच्या माध्यमातून दृकश्राव्य (Audio-Visual) स्वरूपात जनजागृती केली जाणार आहे. हा रथ संपूर्ण भंडारा जिल्हाभर फिरणार असून शाळा, महाविद्यालये आणि गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये जाऊन नागरिकांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे, अमरसिंह चौथे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ, गुलशनकुमार चवरे, अनिल ढोले, मेघाराणी काशिद यांच्यासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी आणि वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रस्ते सुरक्षा – जीवन रक्षा” हा संदेश केवळ घोषणेपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या आचरणात येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या रथाद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी यावेळी केले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अपघातांच्या प्रमाणात घट होईल आणि वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होईल, असा विश्वास आरटीओ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.