spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संजय राऊत उबाठाचे खातात आणि काँग्रेसची चाकरी करतात

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :- उबाठा गट वाढण्यासाठी संजय राऊत जितका प्रयत्न करत नाहीत, त्यापेक्षा जास्त प्रयत्न काँग्रेस वाढली पाहिजे आणि राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसले पाहिजे यासाठी करतात. आज ते ज्या पोटतिडकीने तशी भूमिका मांडत आहेत, त्यावरून स्पष्ट होते ते मीठ उबाठा गटाचे खात आहेत पण चाकरी मात्र काँग्रेस आणि राहुल गांधींची करत आहेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. बिर्ला क्रीडा केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ममता बॅनर्जी, शरद पवार यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचे असतील तर मग उबाठा गटाचे काँग्रेसमध्ये विसर्जन करून राहुल गांधी यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करणार आहात का, याचे उत्तर आधी संजय राऊत यांनी द्यावे. उबाठा गट वाढवण्याची किंवा भूमिका मांडण्याची जबाबदारी असताना फक्त आणि फक्त राहुल गांधींची भूमिका मांडण्याचे काम आणि काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत केला जातो आहे. इंडिया आघाडीच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम महाराष्ट्रात, देशातही झाल्याने काँग्रेस ही नाकर्ते लोकांची पार्टी आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मात्र एक नक्की आहे की काँग्रेस वाढणार नाही तर काँग्रेसच्या ठिकऱ्या उडून ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये विलीन होईल, अशी टीका बन यांनी केली.

बन पुढे म्हणाले, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ज्यादिवशी उबाठा गटाची किंवा शिवसेनेची काँग्रेस होईल, त्यादिवशी मी माझे दुकान बंद करेन. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपले दुकान बंद करायची गरज होती. अखेर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचे दुकान बंद करून टाकले. महाविकास आघाडीच्या दुकानाला शटर लावण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने केल्याने संजय राऊत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द खरे करून एक दिवस उबाठा गटाचे दुकान बंद करून ते काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचले पाहिजे. महाभारतात संजय ज्यांच्या बाजूने होता ते कौरव होते आणि आताचे संजय कुणाच्या बाजूने आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संजय नावाचे पात्र हे धृतराष्ट्राच्या आणि कौरवांच्या बाजूने होते. त्यामुळे महाविकास आघाडी ही कौरव आहे तर एनडीए ही पांडवांची भूमिका करते. महाभारताच्या काळात ज्या पद्धतीने अर्जुन या देशाचे नेतृत्व करत होता अगदी त्याचपद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जुनाची दृष्टी ठेवून आपला देश कुठे गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे बन यांनी नमूद केले.

रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्याऐवजी ”स्टंटबाजी त्याग” आंदोलन केले पाहिजे. कारण त्यांच्या स्टंटबाजीला महाराष्ट्र वैतागलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 30 तारखेनंतर कर्जमाफीचे लाभ मिळतील, हे माहीत असतानाही प्रसिद्धी आणि स्टंटबाजीसाठी रोहित पवार फक्त आणि फक्त रोज खोटे आरोप करतात. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग आंदोलनाऐवजी स्टंटबाजीत्याग आंदोलन केले तर अधिक हिताचे होईल, असे बन यांनी सुनावले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.