– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- भारतात राष्ट्राध्यक्ष पद्धत येणार असल्याची एक नवी अफवा जनाब संजय राऊतांच्या माध्यमातून सोडली जात आहे. पंतप्रधानपद हे भारताचे सर्वोच्च पद आहे आणि देश प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना एकदा, दोनदा नाही तर तीनदा जनतेने या पदावर निवडून दिले आहे. 2029 मध्येही मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. भारताच्या संविधानात किंचितही बदल होणार नाही, देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत अवलंबली जाणार नाही. तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पहात असलात तरी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ कधीही पूर्ण होणार नसल्याने अफवा पसरवण्याचे धंदे बंद करा, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला.
‘एक देश एक निवडणूक’ हा केवळ भाजपाचा नव्हे तर 140 कोटी जनतेच्या मनातला अजेंडा आहे आणि संविधानाची भाषा संजय राऊत यांनी करू नये. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करणारे, संविधानाची हत्या करणारे काँग्रेसचे लोक होते, हे तुम्ही विसरला असलात तरी देशातील जनता विसरलेली नाही. संविधान बदलणार या फेक नरेटिव्हच्या माध्यमातून तुम्ही लोकसभा जिंकली आणि आता पुन्हा एकदा संविधान बदलणार अशी आरोळी ठोकताहात. परंतु संविधानाचे रक्षण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा करते, हे या देशातील जनतेला ठाऊक आहे. या अजेंड्यामुळे संजय राऊत, तुमचे दुकान बंद होणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या घटनेनुसार ‘एक देश एक निवडणूक’ अजेंडा आम्ही नक्कीच पूर्ण करू, असे बन यांनी सुनावले.
अतिशय उत्तम काम करणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद. पण महाविकास आघाडीचे सरकार असताना मात्र जनतेची कामे करणारा असा एकही मंत्री नव्हता. आमचे सगळे मंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सातत्याने जनतेत असतात आणि त्यांची कामे करतात. बावनकुळे मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी आता संजय राऊत करू लागले असले तरी एक लक्षात घ्या भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तुमच्या गटासारखे उद्धव ठाकरे. मग आदित्य ठाकरे, त्यानंतर तेजस ठाकरे अशी घराणेशाही भाजपात नाही आणि 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार, असे बन यांनी ठणकावून सांगितले.
ज्या संजय राऊत यांना उबाठा गटात नगरसेवकाची उमेदवारी देण्याचाही अधिकार नाही ते भाजपाचा मुख्यमंत्री ठरवत आहेत. भाजपा काय करेल याचे भाकीत करण्यापेक्षा उबाठा गटात नेमके काय होणार, ते पहा. आदित्य ठाकरे तुम्हाला किंमत देत नाहीत, भास्कर जाधव तुम्हाला विचारत नाहीत ते पहा. भाजपाचा निर्णय घेण्यासाठी आमचे केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व सक्षम आहे. राहुल गांधींच्या सांगण्यावरून उबाठा गट चालतो तसे भाजपा इतरांच्या सांगण्यावरून चालत नाही, अशा शब्दात बन यांनी फटकारले.




