spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ‘फिल्ड’वर; अखंडीत वीजेसाठी ग्राहकांचे सहकार्य अपेक्षित!

नागपूर :- विद्युत ग्राहकांना अखंडित, उच्च दर्जाची आणि विश्वासू वीज पुरवठा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. सद्यस्थितीत वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी केवळ यंत्रणाच नव्हे, तर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते थेट मैदानात उतरले आहेत. ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना वेळेवर वीजबिल भरण्याचे सकारात्मक आवाहन केले जात आहे.

महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देण्याचा धडाका लावला आहे. सोमवारी त्यांनी उमरेड, कुही आणि पाचगाव परिसराचा दौरा करून तेथील वीज कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी प्रोत्साहित केले. एवढेच नव्हे तर, त्यांनी थेट थकबाकीदार ग्राहकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना बिलाचा भरणा करण्याचे स्रेहपूर्ण आवाहन केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक आघाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेत नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल लांडे आणि वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्यासह संपूर्ण अभियंता व कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. 31 ऑगस्टपूर्वी थकीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांवर वेगाने पावले उचलली जात आहेत.

याशिवाय, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझले यांनी कामठी रोड व लष्करीबाग परिसरात प्रत्यक्ष फिरून नागरिकांशी संवाद साधला. बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर यांनी बुटीबोरी व आसपासच्या परिसरातील ग्राहकांच्या भेटी घेत थकबाकी भरण्याबाबत प्रबोधन केले. तसेच काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटरे यांनी रिधोरा परिसर आणि सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांनी खापरखेडा परिसरातील ग्राहकांशी संवाद साधत वेळेत बिल भरण्याचे महत्त्व पटवून दिले. या सर्व मोहिमेदरम्यान नागरिकांना सहकार्याचे आवाहन करतानाच, वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या आणि थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाइलाजास्तव खंडित करावा लागण्याची कठोर कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

केवळ वसुलीच नव्हे, तर महावितरणकडून ग्राहकांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘रुप टॉप सौर ऊर्जा योजना’, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप म्हणजेच ‘स्मार्ट’ योजना, आधुनिक ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याचे काम आणि तत्पर वीज जोडणी यांसारख्या तांत्रिक व लोकोपयोगी बाबींचाही मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी यावेळी सखोल आढावा घेतला.

आपल्या सर्वांच्या सहकार्यावरच महावितरणचा वीज पुरवठा आणि विकास अवलंबून आहे. त्यामुळे सर्व सम्मानित वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीजबिलाचा भरणा विनाविलंब करून महावितरणला सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Popular Articles