spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोकण विभागात ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन

– 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविणार

नवी मुंबई :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता विचारात घेऊन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभर ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत. कोकण विभागात हे अभियान दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 22 सप्टेंबर 2025, दि.23 सप्टेंबर ते दि. 27 सप्टेंबर 2025 व दि. 28 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर 2025 या 3 टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ‘पाणंद रस्ते विषयक मोहिम’, दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत शासन तरतुदींची अंमलबजावणी व पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहिम’ तर तिसऱ्या टप्प्यात ‘जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यक्रम उपक्रम राबविणे’ या कार्यक्रमांचा समावेश आहे. अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात एकूण 7 हजार 241 पाणंद/शिव रस्ते असून गाव नकाशाप्रमाणे सदर रस्त्यांची पहाणी करण्याचे काम तालुका स्तरावरून सुरू आहे. तसेच सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये कोकण विभागात घरांचे एकूण उद्दीष्ट 1 लाख 26 हजार 445 असून त्यापैकी 1 लाख 26 हजार 312 (९९.९०%) घरांना मंजूर दिलेली आहे. त्यापैकी 15 हजार 660 घरकुलांचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत सर्व 1 लाख 10 हजार 652 घरकुलांचे काम प्रगती पथावर आहे. गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी व वन क्षेत्र वगळून उर्वरित शासकीय जमिनींवर सन 2011 पुर्वीपासून निवासी प्रयोजनार्थ झालेल्या अतिक्रमणांची यादी निश्चित करण्यात येत आहे. यापुर्वी कोकण विभागात जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी संदर्भात एकूण दाखल 44 हजार 165 वारस फेरफारांपैकी 42 हजार 910 वारस फेरफार मंजूर करण्यात आले आहेत. कोकण विभागातील शासकीय व सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरात असलेल्या जमिनी वगळून उर्वरित आकारीपड जमिनी या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे सुधारित कलम 220 अंतर्गत पुन्हा मिळणेकामी संबंधित मूळ खातेदार अथवा त्यांचे कायदेशीर वारसांनी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे अर्ज करणेबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी आवाहन केले आहे.

कोकण विभागात पाणंद रस्ते विषयक मोहिमेंतर्गत शिवार फेऱ्यांचे आयोजन करणे, गाव नकाशांवर नोंद असलेल्या व नोंद नसलेल्या रस्त्यांचे वर्गीकरण करणे, शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे तसेच विशिष्ट क्रमांक निश्चित करणे, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करणे यांसारख्या बाबी राबविण्यात येणार आहेत. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत शासकीय जमिनीवरील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे, पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप इ. च्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. सेवा पंधरवडा अभियानांतर्गत कोकण विभागातील सर्व जिल्हयांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याव्दारे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आलेल्या असून त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. What’s app व्दारे नागरिकांना प्रमाणपत्र, दाखले, तक्रार निवारण यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ऑनलाईन सदनिका विक्री नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहेत. या कालावधीत सामाजिक सहाय्याच्या योजना राबवून DBT व्दारे थेट खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येतील. लोकअदालत, पेन्शन केसेस, शिधापत्रिका वाटप, वैद्यकीय उपचार दाखला देणे, आयुष्यमान भारत कार्ड देणे यांसारखे उपक्रम अभियानांतर्गत राबविण्यात येऊन पुढे या सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ता व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांचा तसेच जिओ टॅगिंगचा वापर करून शासकीय संसाधनांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अनेक सुविधा थेट ऑनलाईन उपलब्ध होऊन जीवनमान सुकर होणार आहे.

या सेवा पंधरवडयात राबविण्यात येणाऱ्या योजना, सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.