नागपूर :- नवीन बाबुळखेडा येथील मैत्री बुद्धविहार परिसरात गौरधन बागडे व महेंद्र भिवगडे यांच्या घरासमोरील सार्वजनिक विहिरीत गटाराचे पाणी मिसळत असल्याची समस्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर विहिरीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, या मागणीसाठी भारत निर्माण आंदोलनातर्फे नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन क्र. ४ येथील सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. संतोष भुजाडे, नागपूर जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वाखाली, योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील यांच्या आयोजनात तसेच मनोज वैद्य, प्रभाग क्र. ३३ चे संघटक, यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. सदर सार्वजनिक विहिरीत गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून विहिरीत गटाराचे पाणी मिसळण्याचे कारण शोधावे, आवश्यक दुरुस्ती करावी तसेच विहिरीची संपूर्ण स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भारत ठाकरे, महेंद्र भिवगडे, दर्शन जावडे, तुषार ढबाले, आशिष खुबाळकर, बागडे साहेब यांच्यासह भारत निर्माण आंदोलनाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन बाबुळखेडा येथील सार्वजनिक विहिरीत गटाराचे पाणी; भारत निर्माण आंदोलनातर्फे निवेदन









