हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जप्त करून पोलीस मुख्यालयात सुरक्षिततेसाठी ठेवलेला १५ लाख रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडाराचे तहसीलदार संदीप काशीनाथ माकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी भंडाराच्या उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध मोहीम राबविली होती. यावेळी ट्रक क्रमांक MH-40-BG-4798 हा ५ ब्रास मुरुमाची विनापरवाना अवैध वाहतूक करताना मिळून आला होता. याप्रकरणी ट्रक मालक/चालक मारोती ऊर्फ गोलू चौतराम बन्सोड (रा. बेला) याच्याविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा (अप.क्र. ०७/२०२६) दाखल करण्यात आला होता. जप्त केलेले हे वाहन पोलीस मुख्यालय, भंडारा येथे जमा करण्यात आले होते.
पाहणीसाठी गेले असता ट्रक गायब
१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसीलदार संदीप माकोडे आणि कारधा येथील तलाठी विठ्ठल बाबासाहेब मुंढे हे जप्त केलेल्या ट्रकची अधिकृत पाहणी करण्यासाठी पोलीस मुख्यालयात गेले. मात्र, ज्या ठिकाणी ट्रक उभा करण्यात आला होता, त्या ठिकाणी तो मिळून आला नाही. १५ लाख रुपये किमतीचा हा ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस मुख्यालयासारख्या सुरक्षित ठिकाणाहून जप्त केलेले वाहन चोरीला गेल्याने महसूल आणि पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तुमसरे करत आहेत.




