spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूरमधील गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना सिहोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; धनेगाव येथे लपून बसले होते आरोपी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- नागपूर शहरात गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या पाच आरोपींना सिहोरा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत धनेगाव येथून अटक केली आहे. हे आरोपी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून ११ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. सिहोरा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व आरोपींना नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

१६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिहोरा पोलिसांना माहिती मिळाली होती की, धनेगाव येथे काही अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या लपून राहत आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत सिहोरा पोलीस पथकाने तातडीने धनेगाव येथे धाड टाकली आणि पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे कांचन उर्फ लहान भाऊ ठाकरे (२२), आदर्श उर्फ आदु गौतम बनसोड (२२), समीर रवींद्र गजभिये (१८), अभय अशोक पोंगडे (२४, सर्व रा. भीमनगर, नीलडोह, नागपूर) आणि आद्या उर्फ अमित गणेश भलावी (२७, रा. भीमनगर, नागपूर) अशी सांगितली.

आरोपींनी आपली पत्ता नागपूर सांगितल्याने सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी तत्काळ नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्याशी संपर्क साधला. चौकशीत असे निष्पन्न झाले की, या पाचही आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून ते ११ फेब्रुवारीपासून फरार होते.

कारवाईची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सयाम आणि त्यांचे पथक सिहोरा येथे दाखल झाले. सिहोरा पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून आरोपींना पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार साईराम गयेगये, राजू साठवणे, छविलाल क्षरणागत, लोकेश कुंभरे आणि पोलीस शिपाई लोकेश मेहर यांनी पार पाडली. सिहोरा पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.