– ‘महाज्योती’ची द्विजन्मशताब्दी रॅली उत्साहात
– क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० वी जयंती वर्षानिमित्त उपक्रम
नागपूर :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाची मशाल पुढे नेणे हीच खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे यांनी केले. शनिवारी सकाळी कॉटन मार्केट परिसरातील महात्मा जोतीराव फुले स्मारक येथे त्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर’तर्फे आयोजित द्विजन्मशताब्दी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे तसेच प्रादेशिक सहायक संचालक धनराज सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या भाषणात शिवानी दाणी-वखरे यांनी फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत समाजात स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करून सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्या पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे या द्विजन्मशताब्दी वर्षाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरातून या महोत्सवाची भव्य सुरुवात होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. वर्षभर राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक उपक्रमांची ही प्रभावी सुरुवात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यानंतर शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या वेशभूषेत रंगराज गोस्वामी आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत डॉ. वीणा राऊत यांनी साकारलेली जिवंत प्रतिमा. या सादरीकरणाने उपस्थित नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि संपूर्ण वातावरण भारावून गेले. रॅलीदरम्यान समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे संदेश देणारे फलक, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेश झळकत होते. लोहापूल, मॉरेस कॉलेज रोड, झिरो माईल मार्गे मार्गक्रमण करत ही भव्य रॅली संविधान चौकात पोहोचली. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी समता आणि सामाजिक न्यायाच्या घोषणा देत वातावरण भारावून गेले. या रॅलीत प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले, प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये, पंकज पचारे, मयूर चव्हाण, विकास तिळगुळ यांच्यासह ‘महाज्योती’चे कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचाही उत्स्फूर्त सहभाग यावेळी दिसून आला. शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनीही रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.