– ६५ वर्षीय किशोर कंगाले यांचा मृतदेह पुलाखाली आढळल्याने उडाली होती खळबळ; भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची २४ तासांत धडक कारवाई.
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोकणागड येथील एका वृद्ध व्यक्तीच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला आणि त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. किशोर धर्मा कंगाले (६५, रा. भंडारा/कोकणागड) असे मृताचे नाव असून, अमित रमेश लांजेवार आणि योगेश ऊर्फ गप्पु फनिंद्रा पाठक (दोघेही रा. शिवाजी वार्ड, भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मयत किशोर कंगाले हे ९ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता होते. त्यांचे पुतणे मंगेश कंगाले यांनी कारधा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आली की, बेपत्ता होण्यापूर्वी किशोर कंगाले यांनी आपल्या एका मित्राला फोन करून सांगितले होते की, त्यांचा जावई अमित लांजेवार आणि त्याचा मित्र त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करत आहेत. दरम्यान, ११ जानेवारी रोजी धारगाव ते कोकणागड रस्त्यावरील पुलाच्या सिमेंट पायलीमध्ये किशोर कंगाले यांचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जावई अमित लांजेवार आणि किशोर कंगाले यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून अमितने आपल्या मित्राच्या मदतीने सासऱ्याचा काटा काढण्याचे ठरवले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी भा.न्या. संहीता २०२३ च्या कलम १०३(१), १२६(२), २३८, ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच आरोपी अमित लांजेवार हा फरार झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली. आरोपी स्वतःची ओळख लपवून नागपूर आणि रामटेक भागात फिरत होता. त्याने कोणाशीही संपर्क न ठेवण्याची खबरदारी घेतली होती. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आधी अमितला आणि त्यानंतर त्याचा साथीदार योगेश पाठक याला १२ जानेवारीच्या रात्री बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सपोनि शिरीष भालेराव, विवेक सोनवणे, केशव पुंजरवाड, पोउपनि पाटील, सोनपित्रे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. गुन्हयाचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशात साखरे हे करीत आहेत.