हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मालमत्तेच्या वादातून एका नराधम जावयाने आपल्या साथीदारासह मिळून ६५ वर्षीय सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोकणागड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रप्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक किशोर धर्मा कंगाले (वय ६५, रा. भंडारा, ह.मु. कोकणागड) यांचा त्यांचा जावई अमित रमेश लांजेवार (वय ३५, रा. शिवाजी वार्ड, भंडारा) याच्याशी मालमत्तेच्या कारणावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. जावई आणि मुलगी हे मृतकाच्या भंडारा येथील घरी राहण्यास आले होते, मात्र त्यांच्या त्रासाला आणि भीतीला कंटाळून किशोर कंगाले हे गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या पुतण्याकडे (फिर्यादी मंगेश दुलीचंद कंगाले) कोकणागड येथे राहत होते.
९ जानेवारी २०२६ रोजी किशोर कंगाले हे कोकणागड येथून शिंगोरी येथील आपल्या शेतावर मोटारसायकलने (क्र. एम.एच. ३६-सी-११५७) गेले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केली असता त्यांची मोटारसायकल घटनास्थळापासून अर्ध्या किमी अंतरावर रस्त्यावर बेवारस स्थितीत मिळून आली. दरम्यान, किशोर कंगाले यांनी त्याच दिवशी संध्याकाळी ६:२४ वाजता त्यांचे मित्र सुनील चौधरी यांना फोन करून माहिती दिली होती की, “माझा जावई आणि त्याचा मित्र मला रस्त्यात अडवून मारहाण करत आहेत.” त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता.
तपासादरम्यान, गावातील मुरलीधर कंगाले यांना महादेव गिऱ्हेपुंजे यांच्या शेतात मृतकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कपडे रक्ताळलेल्या अवस्थेत सापडले. अखेर ११ जानेवारी रोजी सकाळी कोकणागडकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील पुलाच्या सिमेंट पायलीमध्ये (पाईपमध्ये) किशोर कंगाले यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. आरोपींनी त्यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाखाली लपवून ठेवला होता.
फिर्यादी मंगेश कंगाले यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी आरोपी जावई अमित लांजेवार आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), १२६(२), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.