मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर” “श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त” हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीत उपजिल्हाधिकारी पवार यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी राष्ट्रासाठी आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेले बलिदान आणि मानवतावादी मूल्यांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित केले आहे. या शहीदी वर्षाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट करताना, सामाजिक सलोखा, एकात्मता आणि परंपरेचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज त्यांनी व्यक्त केली.
“हिंद-दी-चादर” उपक्रमांतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रमदान उपक्रम राबवून सेवाभाव, सामाजिक सलोखा व स्वच्छतेचा संदेश दिला जाणार असून, युवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी संदेश पोहोचवण्यासाठी शासन विविध जनजागृती, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणार असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत शुक्रवार 23 आणि शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांत ही मुलाखत शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter):
https://twitter.com/MahaDGIPRFacebook:
https://www.facebook.com/MahaDGIPRYouTube
: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR