– निवडणुकीच्याभूमिवर रामटेक नगर परिषदेचा उपक्रम
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक (दि.२) डिसेंबर २०२५ रोजीला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती अभियान अंतर्गत स्वीप (एसव्हीईईपी) कार्यक्रमाच्या अनुषंगाने बालकदिनानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार (दि.१४) शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी आणि पथनाट्यातून मतदानाचा संदेश दिला. प्रभातफेरीची सुरुवात सकाळी १०.०० वाजता श्रीराम विद्यालयाच्या पटांगणातून झाली. या उपक्रमात श्रीराम विद्यालय, श्रीराम कन्या विद्यालय, समर्थ हायस्कूल, नगर परिषद हायस्कूल, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, ताई गोलवळकर कॉलेज रामटेक अश्या प्रत्येक शाळेकडून किमान ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीविषयक आकर्षक घोषवाक्य फलकांसह सहभाग नोंदविला. दरम्यान प्रभातफेरी श्रीराम विद्यालयाचे पटांगण, तहसिल कार्यालय, पंचायत समिती रामटेक, समर्थ हायस्कूल, आंबेडकर चौक मार्गाने होत गांधी चौकात येथे समारोप करण्यात आला. समारोपापूर्वी गांधी चौक येथे गोलवलकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून मतदान जनजागृती केली. कार्यक्रमात पथनाट्य करणाऱ्या विध्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी विध्यार्थ्यांना नगरपरिषद रामटेक तर्फे बिस्कीटचे पॉकेट व चॉकलेटचे वितरण करून प्रोत्साहन देण्यात आले. उपक्रमात स्काऊट-गाइड तसेच एनएसएस विद्यार्थी गणवेशात बॅण्ड पथकासह सहभागी झालेले होते. लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी युवक आणि विद्यार्थी वर्गाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, अशा जनजागृती उपक्रमांमुळे मतदानाबद्दल सकारात्मक सामाजिक संदेश देण्यास मोठी मदत होत असल्याचे मत निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केले. तसेच दि. ०२ डिसेंबर रोजी मतदान आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने उत्साहाने, निर्भयपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय मतदान करून लोकशाहीचा हक्क बजवावा असे आवाहन केले.
रांगोळी स्पर्धेतूनही दिला मतदानाचा संदेश
नगरपरिषद रामटेक यांच्या वतीने दि. १३ नोव्हेंबर रोजी नगर परिषद क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाही, मतदार जागरूकता आणि सुजाण मतदार या विषयांवर आकर्षक आणि संदेशपर रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून स्पर्धेमुळे युवा पिढीत लोकशाही प्रक्रियेबद्दल सकारात्मक आणि बांधिलकीची भावना निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.




