खापा, वार्ताहर :- पी.एम. श्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथे देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका साकारत विविध विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या भूमिकाही प्रभावीपणे पार पाडत शालेय प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे धडे शिकविले, वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षक दिनानिमित्त भाषणेही केली. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमातून त्यांच्यातील नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि अध्यापन कौशल्याला चालना मिळाली. शिक्षकांची भूमिका प्रत्यक्ष साकारताना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत आणि शाळेचे प्रशासन यांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

विशेष म्हणजे मुख्याध्यापक मानवी नितीन कुहिटे, उपमुख्याध्यापक आरुषी कैलास पोटोडे, पर्यवेक्षक नंदिनी विलास खुबाळकर तसेच सुमारे ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकाची एकदिवसीय भूमिका व पदभार सांभाळला. विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत वर्गशिक्षण आणि शालेय कामकाजात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे, ज्येष्ठ शिक्षक असलम खान, ज्येष्ठ शिक्षिका नीता चामाटे, सुनील हेडाऊ, नम्रता मडके, सोनाली सावंनकर, प्रमोद बावनकुळे, कुमार पाटील, श्रीकृष्ण मौदेकर, भाग्यश्री सांडे, ज्योती गजभिये, अनिल टेकाडे, विजय नांदेकर, इमरान खान यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत उत्साहाने व प्रभावीपणे पार पाडल्याने शाळेत दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘एक दिवस शिक्षक’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव होण्यासोबतच शिक्षण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.





