Tuesday, February 24, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रामटेक-तुमसर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

रामटेक :- रामटेक ते तुमसर या प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा नागरिकांकडून अद्यापही कायम आहे. जवळपास ४६.५० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी मार्गासाठी २०१५-१६ दरम्यान सविस्तर पाहणी करण्यात आली असून संबंधित अहवाल रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अंतिम प्रशासकीय मान्यतेअभावी प्रकल्प रखडलेला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ५ एप्रिल २०१६ रोजी रेल्वे बोर्डाकडे अधिकृत अहवाल सादर करत कॉनिसन्स इंजिनिअरिंग कम ट्रॅफिक (आर.ई.सी.टी.) सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे नमूद केले होते. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ५४८.०१ कोटी रुपये असून परताव्याचा दर (आरओआर) ७.६ टक्के इतका दर्शविण्यात आला आहे. प्रकल्पाची नोंद ‘ब्ल्यू बुक’मध्ये करण्यात आली असून तो सुरुवातीला मध्य रेल्वेच्या अखत्यारीत होता. झोनल फेरबदलानंतर ८ एप्रिल २०१५ रोजी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडे वर्ग करण्यात आला.

प्रस्तावित मार्गावर तुमसर तालुक्यातील आंधळगाव व कांद्री तसेच नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे नवीन रेल्वेस्थानके उभारण्याची तरतूद आहे. याशिवाय रामटेक आणि तुमसर येथील विद्यमान स्थानकांचा विकास करण्याचाही प्रस्ताव आहे. या मार्गामुळे स्थानिक दळणवळण सुलभ होण्यासोबतच आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

माहितीच्या अधिकारातून उपलब्ध तपशीलानुसार, एकूण खर्चापैकी ४३२.२७ कोटी रुपये स्थापत्य अभियांत्रिकी कामांसाठी, ६३.३६ कोटी रुपये विद्युत अभियांत्रिकीसाठी तर ५२.३८ कोटी रुपये विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या पत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा मार्ग पूर्ण झाल्यास शेतकरी, व्यापारी तसेच दुग्ध व्यवसायिकांना मोठा फायदा होईल. रामटेक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटनालाही चालना मिळू शकते. विदर्भातील ग्रामीण भागांना थेट रेल्वे जोडणी मिळाल्यास नव्या आर्थिक संधी उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com