spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवड्यात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची दहशत; पथक आल्याच्या चर्चेने अवैध पानटपऱ्या, दुकाने बंद

पांढरकवडा :- शहरात शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाल्याची केवळ एक अफवा पसरली आणि पाहता पाहता शहरातील सर्व पानटपऱ्या अचानक बंद झाल्या. या अफवेमुळे किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि गुटखा विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. काहींनी दुकानातील भेसळयुक्त पदार्थांची लपवाछपवी केली, तर काहींनी गुटख्याचे मोठे साठे इतरत्र हलविल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

प्रत्यक्षात शहरात कोणतेही पथक आले नव्हते की कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाच्या केवळ एका अफवेने अवैध धंदे चालकांची अक्षरशः झोप उडवली. जर सर्व काही नियमाप्रमाणे आणि कायदेशीर सुरू असेल, तर केवळ एका अफवेने एवढी धास्ती का? असा सवाल आता उपस्थित होत असून, या प्रकारामुळे पांढरकवडा शहरातील अवैध धंद्यांचे वास्तव चव्हाट्यावर आले आहे.

पांढरकवडा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम गुटखा विक्री, खाद्यतेलातील भेसळ, उघड्यावरील अन्नपदार्थ, केमिकलयुक्त फळे तसेच भेसळयुक्त दही-दूध-खवा विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या घटकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून मात्र कोणतीही प्रभावी किंवा सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. केवळ अफवेने एवढी खळबळ उडू शकते, तर प्रत्यक्ष छापेमारी झाली तर किती मोठे सत्य समोर येईल? असा प्रश्न आता पांढरकवडा वासीयांना पडला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता पांढरकवड्यात विशेष मोहीम राबवून सखोल तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Popular Articles