वंचितांची सेवा करणाऱ्या व्यक्तीची योग्य दखल घेऊ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट
राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे उद्घाटन
विविध पुरस्कारांचेही वितरण
नागपूर, 30 : 21 व्या शतकातील भारत पुढे नेताना राज्यातील विविध भागात होत असलेल्या परिषदांचे आयोजन हे शासनाच्या योजनांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या परिषदांतून निघणारी तथ्ये, माहिती ही विकसित भारत घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारी आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविताना याची निश्चितच दखल घेण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर येथे विवेक विचार मंच, बार्टी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते. सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महानाग भंतेजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावर यांच्यासह सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी या परिषदेतून चांगले विचार पुढे यावे. विकसित महाराष्ट्र घडविण्यात सामाजिक न्याय परिषदेचे योगदान महत्वाचे योगदान असावे. या परिषदेला राज्यातील विविध भागातून नागरिक, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहे. वंचित समाजाच्या उत्थानासाठी या परिषदेतून निघणारी तथ्य तथा माहिती शासनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले.
वंचितांची सेवा करणाऱ्या व्यक्तीची योग्य दखल घेऊ – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यावेळी म्हणाले की, समाजातील वंचित घटकांची विविध माध्यमातून ज्यांनी सेवा केली आहे त्याची दखल घेण्याची गरज आहे. अनेक जण विविध अडचणीवर मात करून समाज कार्य करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे. त्यांना आणखी पुढे जाण्याचा उत्साह कायम राहिला पाहिजे, असे मंत्री शिरसाट यावेळी म्हणाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना व उपक्रम आहेत. हे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यात येत असल्याचे मंत्री शिरसाट यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक महेश पोहनेरकर यांनी केले. सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार सागर शिंदे यांनी मानले.
विविध पुरस्कारांचे वितरण
विवेक विचार मंचातर्फे दिला जाणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार 2025 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. रेखा बहनवाल, ॲड. संदीप जाधव, पश्चिम महाराष्ट्र राजेंद्र गायकवाड, येथील चंद्रकांत काळोखे, आनंद लोखंडे, विकास अवसरमल, नागेश पाटील, प्रताप निंदाणे, रेखा कांबळे, खुशाल ढाक यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.








