spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या गौरवशाली इतिहासाचे जतन व्हावे – केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

– मनपाच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनी माजी महापौर व उपमहापौर यांचा सहृद सत्कार

नागपूर :- नागपूर शहरातील सर्व माजी महापौर व उपमहापौरांनी पक्षभेद विसरून नागपूर शहराच्या विकासात दिलेले योगदान अमूल्य असून या शहराच्या या वाटचालीचा व गौरवशाली परंपरेच्या इतिहासाचे जतन व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज (ता. 2) मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधीत केले. अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या. या कार्यक्रमात सर्व माजी महापौर व उपमहापौर तसेच दिवंगत महापौर व उपमहापौरांच्या कुटुंबियांचा मनपाचा मानाचा दुपट्टा, गौरव चिन्ह, श्रीफळ व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. विलास डांगरे यांचा सुद्धा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर यांच्या हस्ते मानाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह, श्रीफळ व तुळशीचे रोपटे करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आमदार आमदार कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, आमदार संदीप जोशी, आमदार  प्रवीण दटके, आमदार  मोहन मते, उपमहापौर लिला हाथीबेड, , सत्तारुढ पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, कुंदा विजयकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपस्थित होते.

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व माजी महापौरांचा व माजी उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह, श्रीफळ व तुळशीचे रोपटे असे सत्काराचा स्वरुप होते. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व महापौर निता ठाकरे यांनी माजी महापौर कुंदा विजयकर, विकास ठाकरे, दयाशंकर तिवारी, प्रा. अनिल सोले,  संदीप जोशी, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, वसुंधरा मासूरकर, माया इवनाते, किशोर डोरले, राजेश तांबे, पांडुरंग हिवरकर या माजी महापौरांचा सत्कार केला.

त्याचप्रमाणे मानाचा दुपट्टा, गौरव चिन्ह, श्रीफळ व तुळशीचे रोपटे देऊन माजी उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कारमूर्तींमध्ये माजी उपमहापौर राजेंद्र लोखंडे, शेखर सावरबांधे, रघुनाथ मालीकर,  अण्णाजी राऊत, मनीषा कोठे, डॉ. रवींद्र भोयर, संदीप जाधव, मुन्ना पोकुलवार, अशोक जर्मन, सुनील अग्रवाल जैतूनबी अशफाक पटेल, दीपराज पार्डीकर यांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

दिवंगत महापौर व उपमहापौरांच्या कुटुंबियांचा सत्कार महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मानाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन केला.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या गौरवशाली इतिहासात सर्व पक्षाच्या महापौरांनी बजावलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नागपूर शहराच्या विकासात काळानुसार बदल होत गेले. सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या सर्वच महापौर व उपमहापौरांनी मिळून कार्य केले. यामुळे नागपूर शहराचा विकास झाला आहे. या गौरवशाली परंपरेच्या इतिहासाचे जतन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी मनपाने पुढाकार घेऊन हा इतिहास डीजीटलच्या माध्यमातून जतन करावा, असे सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात 75 उद्यानांचा विकास करावा, मनपाचे उत्पन्न वाढेल, अशा उपाययोजना कराव्या, नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्याप्रती आपले दायित्व कायम राखल्यास नागपूर शहरात देशातील एक सर्वोत्कृष्ट शहर होईल, असेही ते म्हणाले.

 जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास कटिबद्ध- निता ठाकरे

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी मनपाला मिळालेला विकासाचा पुढे नेण्याचा मनोदय व्यक्त केला. नागपूर शहरातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे त्यांना सर्व नागरी सुविधा गुणवत्तापूर्ण मिळाव्या, यासाठी कायम प्रयत्न केले जाईल. या निमित्ताने सर्व माजी महापौरांच्या अनुभवाचा फायदा हे निर्णय राबविताना मिळेल, त्याचप्रमाणे पदाधिकारी व प्रशासनाच्या मदतीने जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. देशाच्या हृदयस्थानी वसलेल्या या शहराचा विकास झाला आहे. म्हणजे दीडशेपेक्षा अधिक काळापासून या शहरात स्थानिक स्वराज्य संस्था विकासाचे कार्य करीत आहे. या काळात विविध नेत्यांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी, स्थायी समितीच्या अध्यक्षांनी, नगरसेवकांनी, अधिकारी व कर्मचार्यांनी या शहरातील नागरी सुविधा मजबूत व बळकट करण्यासाठी तसेच शहराला सुंदर करण्यासाठी प्र्यत्न केले आहेत. हा दिवस त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

 सर्वच महापौरांचे मोलाचे योगदान – दयाशंकर तिवारी

यावेळी बोलताना माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहराच्या विकासाच्या विविध टप्प्याचा आढावा घेतला. प्र्त्येक महापौरांच्या काळात नागपूर शहरात चांगले कार्य झाले आहे. त्यामुळेच शहर विकासाच्या नव्या टप्प्यावर आले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी नगरसेवकांना आपल्या अधिकाऱ्यांचे जतन करुन व अधिकाराचा शहराचा विकासासाठी वापर करावे, असे आवाहन केले.

महापौर निता ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत पुष्पगुच्छ, मानाचा दुपट्टा, व सन्मान चिन्ह देऊन केले.

प्रारंभी शहराचे पहिले महापौर बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या प्रतिमेला महापौर निता ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सह सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एका कारखान्यातील स्फोटामध्ये मृत पावलेल्या कामगारांना यावेळी मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.