नागपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मार्गिकेत लोखंड खाणीला परवानगी दिल्यामुळे परिसरातील सुमारे ६० पेक्षा अधिक वाघांचा अधिवास धोक्यात आला आहे. वाघांचा हा संवेदनशील अधिवास असून खाणीच्या पट्ट्यातच आठ निवासी वाघ आहेत. तर अनेक प्रसिद्ध वाघदेखील याच मार्गिकेमध्ये आहेत. राज्य वन्यजीव मंडळाच्या एका निर्णयामुळे या वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
राज्य वन्यजीव मंडळाच्या ६ जानेवारीला झालेल्या बैठकीत तज्ज्ञ सदस्यांचा विरोध डावलून मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारगड खाणीला हिरवा कंदील दाखवला. ताडोबा-ते उमरेड कऱ्हांडला या दोन्ही वाघांची घनता असणाऱ्या जंगलाला जोडणाऱ्या मार्गिकेत ही खाण येत आहे. या खाणीमुळे घोडाझरी अभयारण्य ते वाघांनी समृद्ध असलेले ब्रह्मपुरीलगतच आहे. तब्बल सात वर्षांपासून हा प्रस्ताव मंडळाच्या बैठकीत आल्यानंतर प्रत्येक वेळी तो नाकारण्यात आला. तज्ज्ञांच्या समितीनेही ही लोखंडाची खाण जंगलात होऊ नये असाच अहवाल दिला. मात्र त्यानंतरही ही खाण मंजूर करण्यात आली.
मंडळाच्या या निर्णयानंतर काही तज्ज्ञ पर्यावरण, वन्यजीव अभ्यासकांनी या परिसरात भेट दिली. त्यावेळी त्यांना वाघाची विष्ठा जागोजागी दिसली, तसेच ताज्या पाऊलखुणांच्या स्वरूपात वाघाचे अस्तित्वही जाणवले. ज्या ठिकाणी खाणीचा प्रस्ताव आहे, त्या ठिकाणी असलेल्या पहाडावरून चार पाणवठ्यांना पाणीपुरवठा होतो. खाणीमुळे हा पाण्याचा स्राोतदेखील बंद होणार आहे.
● अन्य प्राण्यांसह झाडांवरही संकट
● केंद्रीय वन्यजीव मंडळानेही त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केल्यास एक-दोन नाही तर तब्बल ६० पेक्षा अधिक वाघांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
● खाणीच्या परिसरातच आठ निवासी वाघ आहेत. तर ‘बिट्टू’ नावाच्या वाघासह अनेक प्रसिद्ध वाघांचे वास्तव्य या ठिकाणी राहिले आहे.
● वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अधिसूची एकमधील वाघांसह इतरही प्राण्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे.
● वाघांना आश्रय देणारे शेलझरी, साजा, बीजा, हेदू, भिर्रा आणि निर्माळीची झाडे आहेत. मात्र या प्रकल्पामुळे सुमारे १८ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत.
● ही खाण झाली तर वाघांचा अधिवास नष्ट होईल, पण त्याबरोबरच वाघांचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्याचे मार्गही बंद होतील.
आम्ही ज्या वाटेने गेलो, त्याच वाटेने वाघ नुकताच गेला होता. हा वाघांचा संवेदनशील अधिवास असून त्याच्या खुणा आम्हाला जागोजागी दिसून आल्या. ही मार्गिका म्हणजे अत्युच्च पातळीवरील पर्यावरण प्रणाली आहे. भारतात या पद्धतीचे जंगल केवळ चारच टक्के शिल्लक आहे. लोहारडोंगरी हे त्यापैकी एक आहे. त्यामुळे एका खाणीसाठी ही पर्यावरण प्रणाली उद्ध्वस्त करून ती दुसरीकडे तयार करू, असे म्हणणेच चुकीचे आहे. त्यामुळे मानव-वाघ संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर हे जंगल वाचवावे लागणार आहे.
– प्राची माहूरकर, पर्यावरणतज्ज्ञ