मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख
मुंबई २८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमात केले. याच कार्यक्रमात पंतप्रधान श्री. मोदी यांनी पैठण तालुक्यातील पैठणी निर्मिती उद्योग चालविणाऱ्या कविता ढवळे यांच्या कामाचेही कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात म्हणाले की, आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, अशी बातमी युनेस्कोकडून आली आहे. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ‘ म्हणून मान्यता दिली आहे. या प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचे एक – एक पान जोडले आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. साल्हेरच्या किल्ल्यामध्ये मुघलांचा पराभव झाला होता. शिवनेरी, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की, त्यांना जिंकणे शत्रूला शक्य झाले नाही. खांदेरीचा किल्ला तर समुद्रामध्ये बनविण्यात आलेला अद्भूत किल्ला आहे. हा किल्ला तयार होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी राजांना रोखण्याचे अनेक प्रयत्न शत्रूंकडून झाले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. प्रतापगडच्या किल्ल्यामध्ये अफजल खानाला पाणी पाजले होते. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, याचे प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडते. काही वर्षांपूर्वी मी रायगड ला गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील पुतळ्यासमोर मी नतमस्तक होऊन वंदन केले होते. त्यावेळी आलेल्या अनुभूतीचा क्षण अगदी आयुष्यभरासाठी माझ्या मनामध्ये कोरला गेला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील कविता ढवळे यांनी प्रारंभी एका लहानशा खोलीमध्ये व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे जागा नव्हती की, इतर काही सुविधा नव्हत्या. सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्यातील कलेला भरारी घेण्याचं बळ मिळालं. आता त्या या व्यवसायातून तिप्पट कमाई करतात. आता त्या स्वतः पैठणी विणतात आणि त्यांची विक्री करतात, अशा शब्दांत श्री. मोदी यांनी कविता ढवळे यांचे कौतुक केले.
पुढच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स ऑलिंपियाडचे आयोजन केले जात आहे. यामध्ये 60 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी सहभागी होतील. शास्त्रज्ञही यावेळी उपस्थित राहतील. आत्तापर्यंत झालेल्या ऑलिंपियाडमध्ये हे सर्वात मोठे, भव्य ऑलिंपियाड होईल, असेही श्री. मोदी यांनी नमूद केले.




