– दोन मित्रांना वाचवण्यात यश; तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हृदयद्रावक घटना
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र असतानाच, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तामसवाडी येथे काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. वैनगंगा नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी क्षितिज लीलाधर लांजेवार (१५) या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन मित्रांना स्थानिक तरुणाने धाडसाने वाचवले, मात्र क्षितिजचा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरला येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालयात इयत्ता १० वीत शिकणारे तीन मित्र—क्षितिज लांजेवार, आर्यन श्रीराम ठाकरे आणि रुद्र पिंटू अमृते—संक्रांतीनिमित्त मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास तामसवाडी येथील वैनगंगा नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. सणाचा आनंद साजरा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही अचानक खोल पाण्यात ओढले गेले आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले.
एका तरुणाचे धाडस: दोन जीव वाचले
या मुलांचा आक्रोश ऐकून घटनास्थळावर उपस्थित असलेल्या मनोज केवट या तरुणाने आपल्या प्राणाची पर्वा न करता तातडीने नदीच्या पात्रात उडी घेतली. मनोजने मोठ्या शिताफीने आर्यन ठाकरे आणि रुद्र अमृते या दोघांना मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने क्षितिज लांजेवार हा खोल पाण्यात गडप झाल्याने त्याला वाचवण्यात यश आले नाही.
क्षितिज हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने लांजेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात सणाचा उत्साह असायला हवा होता, तिथे आता फक्त आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. पोलीस आणि गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर क्षितिजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेमुळे नदी पात्रातील धोक्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सणासुदीच्या दिवशी एका उमद्या विद्यार्थ्याचा अंत झाल्याने तामसवाडी आणि डोंगरला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




