– भव्य श्रीरामकथेचा महाआरतीने दिमाखदार समारोप
– चंद्रपूर राममय करणाऱ्या श्रीरामकथेतून धर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा जागर
– रामकथेने चंद्रपूर झाले ‘राम’पूर; चंद्रपूरमध्ये भक्तीचा महासागर
– रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव
चंद्रपूर :- आयुष्याला खरे समृद्ध करणारा आनंद कोणता असेल, तर तो रामकथेचा आहे. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींना भेटलो; मात्र त्यांच्या चेहऱ्यावरही जो समाधानाचा भाव दिसला नाही, तो आज पूज्य राजन महाराजांची रामकथा ऐकताना एका साध्या, निर्धन महिलेच्या चेहऱ्यावर उमटलेला पाहायला मिळाला. तो आनंद भौतिक संपत्तीच्या हजारो कोटींपेक्षा कितीतरी मोठा असून, मन आणि जीवन दोन्ही समृद्ध करणारा आहे,” अशी उत्स्फूर्त भावना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून लखमापूर धाम, चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित भव्य श्रीरामकथेचा आज, गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी महाआरतीने दिमाखदार समारोप झाला. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या अध्यात्मिक ज्ञानयज्ञाने चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचे वातावरण राममय केले.![]()
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी लखमापूर धाम येथे आयोजित भव्य श्रीरामकथेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी रामभक्तीची ताकद, रामनामाची ऊर्जा आणि रामकथेचा सामाजिक प्रभाव अत्यंत सुरेख शब्दांत मांडला. “जगातील कोणतेही च्यवनप्राश जेवढी शक्ती देत नाही, तेवढी शक्ती रामधून देते. ८१ वर्षांची ज्येष्ठ महिला १८ वर्षांच्या युवतीप्रमाणे रामधून ऐकताना नृत्य करत होती, हे पाहून मन प्रफुल्लित झाले,” असे सांगत त्यांनी पूज्य राजन महाराजांचे विशेष आभार मानले.
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी “जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होंगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करलो राम से” या ओळींमधून त्यांनी रामकथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला दिशा देणारी मूल्यव्यवस्था आहे, असेही नमूद केले.
दररोज हजारोंची उपस्थिती
मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या श्रीरामकथेमध्ये दररोज हजारो भाविकांनी उपस्थिती लावून कथाश्रवणाचा लाभ घेतला. पूज्य राजन महाराज यांच्या ओजस्वी, रसाळ व अमृतमय वाणीने श्रीरामांच्या जीवनातील आदर्श, त्याग, कर्तव्य आणि करुणेचे संदेश जनमानसात खोलवर रुजवले. रामनामाच्या घोषात, भक्तिरसात चिंब न्हालेल्या या सोहळ्याने समाजमनाला नवसंस्कारांची दिशा दिली.
सांस्कृतिक जाणिवा जपण्याचा दृष्टीकोन
“रामकथा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाला एकत्र बांधणारी मूल्यव्यवस्था आहे,” हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विचार या आयोजनातून प्रत्यक्ष साकार झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार हे सपत्नीक दररोज कथेला उपस्थित राहून भाविकांमध्ये प्रेरणा निर्माण करत होते.![]()
शिस्तबद्ध नियोजन, मनोहारी विद्युत रोषणाई
समारोपप्रसंगी झालेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला. विविध समाजघटक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत केलेली आरती ही सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरली. भव्य व्यासपीठ, शिस्तबद्ध नियोजन आणि मनोहारी विद्युत रोषणाईमुळे चांदा क्लब ग्राऊंडवर खऱ्या अर्थाने दिव्य व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
श्रीरामकथेचा ‘लाईव्ह’ लाभ
विशेष बाब म्हणजे या श्रीरामकथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या पूज्य राजन महाराज यांच्या अमृतवाणीचा लाभ मिळाला. त्यामुळे चंद्रपूरची ही रामकथा केवळ स्थानिक मर्यादेत न राहता राज्यव्यापी आध्यात्मिक उत्सव ठरली.
सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे पर्व
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य श्रीरामकथेमुळे चंद्रपूरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे पर्व जोडले गेले असून, हा भक्तिरसाचा प्रवाह दीर्घकाळ मुख्य जनमानसात प्रेरणा देत राहील, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.