spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘स्वरार्जुन’मधून उलगडणार महाभारताचा सांगीतिक प्रवास

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘स्वरार्जुन’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘स्वरार्जुन’ हा एक सांगीतिक महाभारत प्रवास असून, गीत, संगीत आणि कथा यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. महाभारतातील विविध प्रसंग, व्यक्तिरेखा आणि प्रेरणादायी जीवनमूल्ये संगीत व कथनाच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात संगीत – माधुरी नाईक, निवेदन – श्रीराम केळकर आणि कवी – श्रीरंग (श्रीपाद सहस्त्रबुद्धे) यांचा सहभाग आहे. सोमेश नार्वेकर, केतकी चैतन्य आणि धनंजय म्हसकर हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत.

वाद्यवृंदामध्ये तबला – अमेय ठाकूरदेसाई, पखवाज – हनुमंत रावडे, तालवाद्य – गंधर्व पाटील व संतोष पेडेकर, बासरी – विजय तांबे, सतार – पंडित उमाशंकर शुक्ल, की-बोर्ड – झंकार कानडे व अक्षय कावळे यांचा सहभाग आहे. संकल्पना व निर्मिती – वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल असून, संगीत संयोजन – सोमेश नार्वेकर व अमेय ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती, साहित्य, संगीत आणि कलापरंपरेतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘स्वरार्जुन’ या गीत, संगीत आणि कथनाच्या माध्यमातून साकारलेल्या महाभारताच्या प्रेरणादायी सांगीतिक प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.