हंसराज, प्रतिनिधी भंडारा अड्याळ :- पवनी तालुक्यातील भावड येथे श्री शंकर भगवान यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात अड्याळ पोलिसांना यश आले आहे. ज्ञानेश्वर शामदेव चिचमलकर (वय ४२, रा. भावड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
१६ आणि १७ जानेवारीच्या मध्यरात्री भावड येथील शंकर देवाच्या मूर्तीचे दोन्ही हात तोडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्वतः लक्ष घालून अड्याळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी-अंमलदार यांची एकूण सात पथके तयार केली होती.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, भावड गावातीलच ज्ञानेश्वर चिचमलकर हा घटनेच्या दिवसापासून गावातून बेपत्ता (फरार) आहे. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने सर्व पथकांनी त्याचा कसून शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी भंडारा बस स्थानक परिसरात असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्ञानेश्वरची कसून चौकशी केली असता, त्याने भावड येथील मूर्तीची तोडफोड केल्याची कबुली दिली. याप्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात अपराध क्र. १७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून पवनी विधानसभा क्षेत्रात मोठे आंदोलन झाले होते. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून मुख्य आरोपीला अटक केल्यामुळे आता या भागातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.