Wednesday, February 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शालेय बसने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या जीवनाची परीक्षा संपवीली

– शालेय बसच्या धडकेत १९ वर्षीय विद्यार्थी जागेवरच ठार

खापा, वार्ताहर :- सावनेर पारशिवनी राष्ट्रीय महामार्गावर खैरी पंजाबराव (ता. सावनेर) येथे (दि.२४) मंगळवारला सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या युवकाचा गंभीर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सिलेंदन बुद्धलाल परतेती (वय १९ वर्ष, रा. कोदेगाव, ता. सावनेर) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंदन परतेती हा दुचाकीने बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर देण्यासाठी जयसेवा आदिवासी ज्युनियर कॉलेज, दाहोदा, ता. रामटेक या परीक्षा केंद्रावर जात होता. खैरी पंजाबराव येथे एक शालेय बस क्र. एम एच ४० वाय ०७८० आणि दुचाकी क्र. एम एच ३६ ए एफ ८६२१ ची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की सिलेंदनचा जागीच मृत्यू झाला. सिलेंदन हा घरात एकुलता एक असल्याने आई वर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

“भरधाव शालेय बस ची जोरदार धडक

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र गंभीर दुखापतीमुळे सिलेंदनची प्राणज्योत मालवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

“बारावीच्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे”

सध्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून सिलेंदन ही परीक्षेला बसला होता. परीक्षा काळातच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने त्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे राहिले. एका उमद्या विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने कोदेगावात आणि त्याच्या शाळेत शोककळा पसरली आहे.

“पोलिसांची कारवाई सुरू”

घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच हितज्योती आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालय, सावनेर येथे पाठवला. डॉक्टरांनी तपासून युवकाला मृत घोषित केले. पुढील तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून अपघाताची नेमकी कारणे शोधली जात आहेत.

पालकांनी आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर एकटे न पाठवता पालकांनी त्यांना सोडून द्यावे. तसेच वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळेच्या आधी निघून सुखरूप व शांतपणे प्रवास करून केंद्रावर पोहोचावे. परीक्षा केंद्रावर अथवा परिसरात कसल्याही प्रकारे काही अडचण निर्माण होत असेल तर खापा पोलिसांना संपर्क करावा.

– किशोर भुजाडे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, खापा.

सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे. प्रत्येक जण चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण या धावपळीत एक गोष्ट विसरू नका- तुमचं आयुष्य कोणत्याही परीक्षेपेक्षा मोठं आहे. अलीकडे परीक्षा द्यायला जाताना घाई गडबडीत अपघात होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. उशीर होऊ नये म्हणून वेगात गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे, या चुका जीवावर बेतू शकतात.

– हितेश बनसोड, संस्थापक अध्यक्ष हितज्योति आधार फाऊंडेशन.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com