– हवामान खात्याचा अंदाज
नागपूर :- भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांसह आणखी काही दिवस राज्यातील तापमानात घट सुरू राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि विशेषकरुन विदर्भात पहाटे आणि रात्री थंडी जाणवत असली तरीही दिवसा मात्र उकाडा जाणवायला लागला होता. तर काही भागात ढगाळ वातावरण देखील होते. मात्र, आता हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील तापमानात घट सुरूच राहणार असून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यात थंडीसोबतच वातावरण अंशत: ढगाळ असेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर धुक्याचे चित्र पाहायला मिळेल.
मराठवाड्यात प्रामुख्याने हवामान कोरडे असेल. तर, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम इथे जास्त दिसून येईल. विदर्भातही मराठवाड्याप्रमाणेच हवामानाची स्थिती कायम राहणार असून तापमानात होणारी घट सुरूच राहणार आहे. ज्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात चढ – उतार पाहायला मिळणार असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा तर दुपारच्या वेळी तीव्र सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा अशीच एकंदर स्थिती पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्यप्रदेश, ओडिशामध्ये ढगाळ वातावरण, पंजाब हरियाणामध्ये धुक्याची स्थिती, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर पूर्वोत्तर भारतात धुके नागरिकांच्या अडचणींमध्ये भर टाकणार आहे. देशभरात प्रामुख्याने उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, २२ व २३ जानेवारीदरम्यान पश्चिमी झंझावात अधिक प्रमाणात सक्रिय असेल. ज्यामुळे पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानी भागांमध्ये थंडीचा कडाका सातत्याने वाढत जाण्याचे चित्र असून थंडीचा हा कडाका येत्या दिवसात वाढणार असल्याचा इशारा आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, ही थंडी इतक्यात पाठ सोडणार नाही असे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिल्लीसोबतच संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या थंडीचा कडाका वाढत असून, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. मात्र, पुढील ४८ तासांमध्ये हवामानात मोठे बदल होणार असून, भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात पाऊस आणि हिमवर्षावाचे पर्व सुरू होणार आहे. देशाच्या उत्तरेकडे होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.