Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

सिहोरा नगरीत रामनामाचा गजर; प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा  

भंडारा सिहोरा :- येथील बाजार चौक परिसरातील हनुमान मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. नऊ दिवसांच्या अखंड रामायण पठणानंतर, सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत प्रभू श्रीरामाची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. लेझीम पथक, पारंपारिक वाद्ये, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि हातात भगवे ध्वज घेतलेले युवक यामुळे संपूर्ण सिहोरा नगरी भगवामय झाली होती. “जय श्रीराम”च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

भक्तांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, तोरणे आणि स्वागतद्वारे उभारण्यात आली होती. तसेच विविध संस्थांच्या वतीने थंड पाणी, शरबत आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी महाआरतीने या सोहळ्याची सांगता झाली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिहोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय कसोधन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या शोभायात्रेत सिहोरा परिसरातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com