हंसराज,भंडारा साकोली :- गेल्या तीन महिन्यांपासून साकोली तालुक्यातील आमगाव आणि परिसरातील गावांमध्ये दहशतीचे केंद्र बनलेली जखमी ‘टी-२७’ वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. २८ जून रोजी आमगाव (बु.) येथील एका ऊसाच्या शेतातून या वाघिणीला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वाघिणीच्या हल्ल्यात दोन मृत्यू, परिसरात होती दहशत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर परिसरातील बाम्पेवाडा, उमरझरी, शिवनटोला, आमगाव (बु.) आणि घानोड या जंगल सिमेलगतच्या भागात १९ मार्च २०२६ पासून ‘टी-२७’ या वाघिणीचा वावर होता. ही वाघीण जखमी असल्याने तिला नैसर्गिक शिकार करणे कठीण जात होते, परिणामी तिने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला होता. या काळात तिने बाम्पेवाडा येथे एका व्यक्तीला ठार केले, तर शिवनटोला येथील एका महिलेचा हल्ल्यात जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसेच आमगाव (बु.) येथे एका महिलेसह अन्य एका व्यक्तीला गंभीर जखमी केले होते. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले होते.
युध्द पातळीवर राबविली मोहीम वाघिणीचा वाढता धोका लक्षात घेता, मुख्य वन्यजीव रक्षक, नागपूर यांनी १० एप्रिल २०२६ रोजी तिला जेरबंद करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत एसटीपीएफ (STPF) १, २ आणि ३ दल, जलद बचाव दल (RRT) भंडारा, गोंदिया आणि एफडीसीएम (FDCM) च्या कर्मचाऱ्यांनी युध्द पातळीवर मोहीम हाती घेतली. वाघिणीला गावापासून जंगलाकडे वळवण्यासाठी कृत्रिम पाणवठे आणि अन्नाची सोय करण्यात आली होती. तसेच गावकरी आणि वनविभागाच्या पथकाकडून रात्रंदिवस गस्त घातली जात होती.
ऊसाच्या शेतात रचला सापळा २८ जून रोजी पिटेझरी वनपरिक्षेत्रातील आमगाव (बु.) येथील एका ऊसाच्या शेतात जखमी वाघीण दबा धरून बसल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच आरआरटी चमूने घटनास्थळ गाठले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेघराज तुलावी यांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि चोख नियोजनानुसार वाघिणीला रेस्क्यू करण्यात आले.
पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना ही मोठी कारवाई मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद, क्षेत्रसंचालिका पियुषा जगताप आणि उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सुहास कांबळे (सहायक वनसंरक्षक), नरेंद्र सावंत (वनपरिक्षेत्र अधिकारी), तसेच भंडारा व गोंदिया वनविभागाच्या आरआरटी चमूचा मोलाचा वाटा होता. जेरबंद केलेल्या वाघिणीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिला पुढील औषधोपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा टीटीसी सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
वनविभागाचे आवाहन मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागास सहकार्य करावे. वन्यजीवांचे अस्तित्व आढळून आल्यास तात्काळ ‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाईन क्रमांक १९२६ किंवा ०७१८६-२९५००८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रसिद्धी अधिकारी प्रितमसिंग कोडापे यांनी केले आहे.




