लो. अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी प्रबोधन व सत्कार
यवतमाळ १९ – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न कला, संस्कृती व विकास फाउंडेशन, यवतमाळच्या वतीने एक प्रबोधनात्मक व प्रेरणादायी कार्यक्रम संविधान चौक येथील लॉर्ड बुद्धा कार्यालयात गुरुवार, १८ जुलै २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास महाले होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रवीण देशमुख, तर प्रमुख पाहुणे प्रा. बाळकृष्ण सरकटे, प्रा. यशवंत खंडारे, नवनीत महाजन व रमेश तेलंगे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश देताना प्रा. प्रवीण देशमुख यांनी लो.अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. गिरणी कामगार असताना त्यांनी अनुभवलेल्या कामगारांच्या हालअपेष्टा, भांडवलशाहीचा निषेध, श्रमिकांचे शोषण, यावर आधारित त्यांनी जागृती पर लढा दिल्याचे त्यांनी नमूद केले. बुद्ध, फुले, आंबेडकर, बसवेश्वर, संत गाडगेबाबा यांच्याप्रमाणेच अण्णाभाऊ साठे यांनीही समाज जागृतीची चळवळ उभी केली. देशमुख पुढे म्हणाले, “शिक्षणाशिवाय पर्याय नाही”, हे लक्षात घेऊन मातंग समाजाने अज्ञान झुगारून शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहात यावे. आजही समाज गावकुसाबाहेर राहतो, व्यसनाधीनतेने ग्रासलेला आहे, यासाठी नव्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीचे काम हाती घ्यावे. ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीतील उपेक्षित गटांबाबत विधानसभेत ना चर्चा होते, ना उपवर्गीकरणाचा विचार केला जातो. त्यामुळे समाजाने अंतर्गत गटबाजी टाळून एकतेने अंगूराच्या घडाप्रमाणे राहावे, हा मौलिक सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्विमिंग खेळात प्राविण्य मिळवलेल्या सिद्धांत वानखडे या गुणवंत विद्यार्थ्याचा ही गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रा.नाटकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. प्रवीण देशमुख यांच्या ज्वलंत व्याख्यानाने उपस्थितांना जागृतीचा संदेश मिळाला. मुक्ता साळवे यांचे उदाहरण देत शिक्षणामुळे मिळणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा त्यांनी अधोरेखित केली. “चॉकलेट नव्हे, आम्हाला पुस्तक द्या” ही मागणी करणाऱ्या मुक्ता साळवेप्रमाणे नव्या पिढीनेही शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
हा कार्यक्रम लो.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना व कार्याला आदरांजली वाहणारा ठरला असून, विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी व्यासपीठ बनला आहे. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वानखडे यांनी केले तर फाउंडेशन ची भूमिका अरविंद वानखेडे यांनी विशेध केली. विशाल तेलंगे, सागर कळणे,ज्ञानेश्वर वानखडे,दिनेश वाघमारे,नरेश बावणे, विजय तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. नव्या पिढीला सामाजिक भान व शैक्षणिक भूक निर्माण करणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याची समाधानकारक भावना आयोजकांनी व्यक्त केली.




