यवतमाळ :- जिल्ह्यात २६ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान” राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबविले जाणार आहे.
अभियानाची सुरुवात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणार असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेद्वारे कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांचे कुष्ठरोगाविषयी घोषणापत्र वाचन, कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींविरोधातील भेदभाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रमुख व उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञा तसेच कुष्ठरोगाबाबत माहितीपर संदेश दिले जाणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती व प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान शाळांमधून विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या काढून कुष्ठरोगाविषयी संदेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
कुष्ठरोग हा जंतुसंसर्गामुळे होणारा आजार असून बहुविध औषधोपचारांद्वारे तो १०० टक्के बरा होतो. कुष्ठरोगाचे निदान व उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्णतः मोफत उपलब्ध आहेत. हा आजार दैवी कोप, शाप किंवा अनुवंशिक कारणांमुळे होत नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
समाजातील गैरसमज दूर करून कुष्ठरोगग्रस्त व कुष्ठरोगमुक्त व्यक्तींशी कोणताही भेदभाव न करता त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, तसेच ग्रामसभांमध्ये कुष्ठरोगमुक्त व्यक्तींचा सत्कार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.