spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रिझर्व्ह बँकेमार्फत जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रशिक्षण

Ø दोनशेहून अधिक उद्योजक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

 यवतमाळ :- जिल्ह्यात आर्थिक समावेशन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर कार्यालयातर्फे २३ फेब्रुवारी रोजी ‘विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर एम्पॉवरिंग एमएसएमई’ आणि विशेष टाऊनहॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील २०० हून अधिक एमएसएमई उद्योजक आणि तरुण इच्छुकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक कुश गहोत्रा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे, यवतमाळ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरूड तसेच सिडबी, नाबार्ड आणि इतर प्रमुख बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरबीआय नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन वाय. शेंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्योजकांचे कौशल्य विकास, वित्तीय साक्षरता आणि उद्योगांना औपचारिक क्षेत्राशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ यांनी उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना विदर्भातील स्थानिक संधी आणि आव्हानांना थेट प्रतिसाद देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले.

सहभागींना विविध कर्ज सुविधा व वित्तीय योजनांची माहिती देण्यासाठी बँकांकडून विशेष स्टॉल्स उभारण्यात आले होते. कार्यशाळेत यवतमाळ जिल्ह्याच्या आर्थिक क्षमतेवर आधारित उद्योग संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. उद्यम नोंदणी प्रक्रिया, रेकॉर्ड-कीपिंगचे महत्त्व तसेच केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आदी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांनी आपल्या संघर्ष आणि यशोगाथा सांगून नवउद्योजकांना प्रेरणा दिली. शाश्वत जिल्हास्तरीय एमएसएमई इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.