spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काटली अपघात प्रकरणी ट्रक चालकाला अटक

गडचिरोली ११ : ७ ऑगस्ट २०२५ रोजी गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील मौजा काटली गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. ४८ तासांच्या अथक तपासानंतर हा आरोपी पकडला गेला. पोलिसांनी आरोपीसोबत त्याचा सहचालक आणि अपघातासाठी वापरलेला ट्रक छत्तीसगडमधून ताब्यात घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास काटली येथील काही मुले व्यायामासाठी गावाबाहेर रस्त्यावर गेले होते. पहाटे ५ च्या सुमारास गडचिरोलीकडून आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने या सहा मुलांना चिरडले. या घटनेत दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. इतर चार जखमींना तात्काळ गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आणखी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उरलेल्या दोन जखमी मुलांना तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवध (कलम १०५ भान्यासं) सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळ्या तपास पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर तपास सुरू केला. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर यांच्याकडून मिळालेल्या पुराव्यांवरून अपघातात वापरलेला ट्रक छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक प्रवीण बाळकृष्ण कोल्हे (२६) आणि सहचालक सुनील श्रीराम मारगाये (४७) या दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड येथील रहिवासी आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Popular Articles