Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

2019 मध्ये भाजपाचा विश्वासघात केल्याचे फळ उबाठा ला कल्याणमध्ये मिळाले

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र

2019 ची विधानसभा निवडणूक एकत्रित लढल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात केला. त्याच विश्वासघाताचे फळ आता उद्धव ठाकरेंना कल्याणमध्ये मिळाले आहे. ‘ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ‘ हे उबाठा आणि संजय राऊतांना आता लक्षात आले असेल, असे टीकास्त्र भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांना नितीमत्ता काय हेच ठाऊक नाही तेच राऊत आणि उबाठा गट मनसेला आता नितीमत्तेची आठवण करून देत आहेत हे हास्यास्पद असल्याचा टोलाही बन यांनी लगावला.

बन म्हणाले की, 2019 विधानसभेला भाजपासोबत युती करून निवडणूक लढल्यानंतर सत्तेसाठी ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना कल्याण डोंबिवली मध्ये ‘मनसे’ ने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर नीतिमत्तेची आठवण होत आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना नितीमत्तेच्या बाता करण्याचा अधिकारच नाही. कल्याण डोंबीवलीमध्ये मनसेने विकास आणि हिंदुत्वासाठी भाजपा शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला आहे.

मुंबई, कल्याण- डोंबिवली , ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र जनतेने महायुतीला कौल दिला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही मतदार उबाठा गटाला घरी बसवणार आहेत. विकास आणि उबाठा गट व राऊतांचा काडीमात्र संबंध नाही. त्यांना विकास हा शब्द आवडत नाही तर केवळ मलिदा, कटकमिशन, खंडणी, लाचखोरी, घोटाळा हे शब्द आवडतात. म्हणूनच राऊतांना विकास हा असंसदीय शब्द वाटतो असे टीकास्त्र बन यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास हे समीकरण जनमानसात रूढ झाल्याचेही ते म्हणाले .

जनाब सेनेला पराभवानंतर लगेच साधूसंतांची आठवण झाली

महापालिका निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादी मतदारांनी हिरवा रंग ल्यालेल्या उबाठा सेनेला फटकारल्यानंतर संजय राऊतांना अचानक साधूसंतांबद्दल प्रेमाचे भरते आले आहे. मुस्लीम मतांसाठी ज्या उध्दव ठाकरे ,राऊतांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ‘जनाब सेना’ केली, त्यांना पराभवानंतर लगेच साधूसंतांची आठवण येत आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा कथित अपमान झाल्याबद्दल राऊत अचानक साधूसंतांची बाजू घेत आहेत ही आनंदाची बाब आहे, उशिरा का होईना राऊतांना उपरती झाली आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केली. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या कथित अपमानाचा तपास होईल. उबाठा सरकार असताना पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी चकार शब्द काढला नव्हता की आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न केले नव्हते याची आठवणही बन यांनी राऊतांना करून दिली.

उबाठा गटाने मनसेचा केसाने गळा कापला

उबाठा गटाने मनसेचे नुकसान केले. यंदा उबाठा सेनेसोबत मनसेची युती असतानाही मुंबईत मनसेचे केवळ 6 नगरसेवक निवडून आले मात्र गेल्यावेळी युती नसताना मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. याबाबत राज ठाकरे यांनी विचारमंथन करावे असे नमूद करून बन म्हणाले की, मनसेच्या रेल्वे इंजिनाला रुळावरून खाली खेचण्याचे काम उबाठा गटाने केल्याने कल्याण डोंबिवली सारखा विचार मनसे अन्यत्रही करण्याची दाट शक्यता आहे. राज- उद्धव यांचा भीतीसंगम असल्याने निवडणुकीतील पराभवानंतर दोन दिवसही एकत्र राहू शकले नाही अशी खोचक टिप्पणी बन यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com