spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उबाठा गटाची आंदोलनाची नौटंकी,नवी मुंबईतील विमानतळाच्या नावावरून राऊतांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई :- अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 31 हजार 628 कोटींचे ऐतिहासिक पॅकेज महायुती सरकारने घोषित केले असताना उबाठा गटाचे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. हे आंदोलन म्हणजे बैल गेला आणि झोपा केला यासारखे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-महायुतीच्या सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी घोषित केलेले ऐतिहासिक पॅकेज ही धूळफेक आहे अशी टुकार टीका करणा-या संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत बन म्हणाले की 31 हजार कोटी कसे उभारायचे याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतील.त्याची नसती उठाठेव राऊतांनी करू नये. त्यांनी आपला पगार घेऊन सामनामध्ये अग्रलेख लिहायचे एवढेच काम करावे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार महाराष्ट्राला भरभक्कम मदत करेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

खा. संजय राऊत यांनी नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, याची मंजुरी देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने केले होते आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता असे म्हणत मोठा विनोद केला आहे असेही बन म्हणाले. विमानतळाच्या नावावरून श्रेय लाटण्याचे हीन काम राऊत करत आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही आग्रहाची भूमिका भाजपाचे आ. प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीपासून मांडली होती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा पाठपुरावा करून लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. उद्धव-राऊत जोडीने दि.बा.पाटील यांच्या नावाला नेहमीच विरोध केला होता आणि आज मात्र या नावावरून घाणेरडे राजकारण करत आहेत, असे बन यांनी नमूद केले.

नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांना सर्व नोक-या मिळायला हव्या अशी मागणी करणा-या राऊतांवर जोरदार प्रहार करत बन म्हणाले की,भूमिपुत्रांवर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही. महापालिकेमध्ये उबाठा गटाची सत्ता असताना सगळ्या अमराठी कंत्राटदारांना कंत्राटे दिली गेली तेव्हा राऊतांना मराठी माणूस आणि भूमिपुत्रांची आठवण झाली नाही. राऊतांनी भूमिपुत्रांच्या जमिनी लाटल्या, भूमिपुत्रांच्या अधिकारांवर गदा आणून पत्राचाळीमध्ये घोटाळा केला. राऊतांना भूमिपुत्रांविषयी गळा काढण्याचा अधिकार नाही असे श्री. बन यांनी खडसावले. या विमानतळावरच काय तर संपूर्ण मुंबईमध्ये महायुती सरकारच्या काळात नोक-यांवर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचाच असणार आहे असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुसणा-यांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे त्याबद्दलचे पुरावे मागितले होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ओळख पुसली जाणार याची अचानक काळजी वाटू लागली आहे हे हास्यास्पद आहे, या शब्दांत बन यांनी राऊतांवर कोरडे ओढले. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुसून अफजलखानाच्या पिलावळीचा उदो उदो करणा-यांनी छत्रपतींचे नाव घेऊ नये असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईमध्ये भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले.

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायलयात अंतीम सुनावणी झाली. यावरून उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाला लक्ष्य करत बन म्हणाले की, जे खानासोबत आहेत त्यांना धनुष्यबाण कधीही मिळणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जो पक्ष चालतो त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत धनुष्यबाण आहे आणि कायम रहाणार आहे.

Popular Articles