ज्येष्ठांकडून सरकारी योजनांचा लाभासाठी, दिव्यांगांकडून कृत्रिम अवयवांसाठी अर्ज
नागपूर ११– केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात निवेदनांचा अक्षरशः पाऊस पडला. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच महिलांनी विविध कामांसाठी गडकरी यांना निवेदनं दिली.
खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांसह विविध सरकारी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. भूमि अभिलेख, समाजकल्याण विभाग, सीआरसी सेंटर, नगर भूमापन अधिकारी, सेतू, पोलीस विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, मुख्यमंत्री सहायता कक्ष, महावितरण आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विभागांशी संबंधित निवेदनं गडकरी यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केली.
याशिवाय, दिव्यांगांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून कृत्रिम अवयव देण्यासंबंधीही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संदर्भात आलेली निवेदनं उपस्थित अधिकाऱ्यांकडे देऊन रुग्णांना तातडीने मदत करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.
ट्रायसिकलच होते व्हिलचेअर
काही तरुणांनी गडकरी यांची भेट घेऊन ट्रायसिकलचे प्रेझेंटेशन दिले. बॅटरीवर चालणाऱ्या या ट्रायसिकलचे बटण दाबताच ते व्हिलचेअरमध्ये रूपांतरित होते. फूड डिलिव्हरीसाठीही अनेक दिव्यांग या ट्रायसिकलचा वापर करत आहेत. गडकरी यांनी या तरुणांचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन केले.
भारताला कृषी सेनेची आवश्यकता
मूळचे अकोल्याचे निळकंठ पाठक गेल्या दोन दशकांपासून शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. त्यांनी गडकरींपुढे ‘कृषी सेना’ ही कल्पना मांडली. भारताला स्थलसेना, वायूसेना, जलसेनेच्या धर्तीवर कृषी सेनेचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्य असलेली माणसं व मजूर मिळत नाहीत. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील मातीची व जमिनीची रक्षा करणारी सेना असण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.
८४ वर्षांचे आजोबा म्हणाले, ‘मी रोज १४ किलोमीटर चालतो’
दररोज १४ किलोमीटर पायी चालणारे ८४ वर्षीय बलदेव चावला यांनी देखील मंत्री महोदयांची भेट घेतली. गडकरी यांनी चावला यांची दिनचर्या ऐकून त्यांचे कौतुक केले. चावला यांनी यापूर्वी एकाच दिवशी सलग २२ तसेच ४२ किलोमीटर चालण्याचा उपक्रम राबविला आहे, हे विशेष. मंत्री महोदयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.








