spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डिझेल, पेट्रोलसाठी वाहनचं न्यावे लागणार पंपावर

– बाटलीबंद विक्रीच्या बंदीमुळे शेतकरी मेटाकुटीला

पांढरकवडा :- सध्या रब्बी हंगाम आटोपल्यानंतर शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या (वयतीच्या) कामात व्यस्त आहेत, मात्र, प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल बाटलीमध्ये देण्यास बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या निर्णयामुळे शेतीची कामे रखडली असून, डिझेलसाठी चक्क ट्रॅक्टरच पंपावर न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक काळात बैलांद्वारे मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असून, बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर बाटली किंवा कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे, यामुळे शेतात उभे असलेले ट्रॅक्टर डिझेलसाठी थेट पंपावर न्यावे लागत आहेत. केळापूर तालुक्यातील शेतकरी ट्रॅक्टर पंपावर आणू शकतात, मात्र ३० ते ४০ किमी अंतरावर असलेल्या गाव-खेड्यातील शेतकर्यांनी डिझेलसाठी ट्रॅक्टर पंपावर कसा न्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका वेळी केवळ ३००० रुपयांचेच डिझेल मिळत असल्याने, काम सोडून वारंवार पंपाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शेतात नवीन विहीर खोदकाम करणाऱ्या जेसीबी मशीन पंपावर घेऊन जाणे अत्यंत कठीण आणि खर्चिक काम झाले आहे. केवळ डिझेलच नाही, तर पेट्रोलची बाटलीबंद विक्रीही बंद करण्यात आली आहे. एखाद्या दुचाकीचे पेट्रोल रस्त्यात संपले, तर वाहनधारकाला बाटलीत पेट्रोल मिळत नाही. परिणामी, भर उन्हात वाहन ओढत (लोटत) पंपापर्यत न्यावे लागत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ही भौगोलिक अडचण लक्षात घेता, या भागातील शेतीची कामे डिझेल अभावी थांबू नयेत यासाठी प्रशासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या.

बाटलीबंद डिझेल विक्रीवर बंदी त्वरित शिथिल करावी

शेतकऱ्यांना शेती कामासाठी मुबलक प्रमाणात इंधन उपलब्ध करून घ्यावे. ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नियमात बदल करावा अशी मागणी शेतकरी करत आहे. या प्रश्नावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles