Friday, February 20, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

२२ फेब्रुवारीला नागपुरात संघ मुख्यालयावर धडकणार ‘विशाल महामोर्चा’; भारत मुक्ती मोर्चाचा भंडारा येथे इशारा

– वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन; ईव्हीएम हटाव आणि जातीनिहाय जनगणनेची प्रमुख मागणी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही वाचवण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर ‘विशाल महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या संदर्भात आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

कटक येथील अधिवेशन रोखल्याचा निषेध

पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, २६ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान ओरिसा राज्यातील कटक येथे ४५ वे बामसेफ आणि १५ वे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. सर्व कायदेशीर परवानग्या असतानाही, ऐनवेळी आर.एस.एस. आणि भाजपच्या दबावामुळे स्थानिक प्रशासनाने हे अधिवेशन रद्द केले. यामुळे संघटनेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, संविधानातील कलम १९ नुसार मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे उघड उल्लंघन आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात वामन मेश्राम साहेब यांनी ४ चरणात आंदोलन घोषित केले असून, त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात हा महामोर्चा काढला जाणार आहे.

या महामोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल करणार आहेत. हा मोर्चा नागपूरच्या इंदोरा चौकातून सुरू होईल आणि महाल येथील संघ मुख्यालयावर धडकेल.

या मागण्यांसाठी लढा

🔹 ओरिसातील रद्द केलेल्या अधिवेशनास पुन्हा परवानगी देण्यात यावी.

🔹 ओबीसींसह सर्व समाजाची ‘जातीनिहाय जनगणना’ तातडीने करावी.

🔹 निवडणुका ईव्हीएम ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर घेण्यात याव्यात.

🔹 संविधानिक मूलभूत अधिकारांना संरक्षण मिळावे.

🔹 नुकसान झालेल्या अधिवेशनाच्या खर्चाची भरपाई मिळावी.

🔹 लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यास अपयशी ठरलेले ओरिसा सरकार बरखास्त करावे.

या विशाल महामोर्चाला भारतातील मूळनिवासी बहुजन समाजातील शेतकरी, कामगार, सामाजिक आणि धार्मिक संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातूनही लाखो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचा निर्धार जिल्हा आंदोलन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यावेळी रविदास लोखंडे, सुभाष भिवगडे, भारत बनसोड, अभय रंगारी, रतन सुखदेवे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com