spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर वरठी पोलिसांची कारवाई; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा वरठी :- जनावरांची अत्यंत क्रूरतेने आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वरठी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ जनावरे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस येताच आरोपी चालक वाहन सोडून पसार झाला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोथली ते पांजरा गावाकडे जाणाऱ्या रोडवर जनावरांची अवैध वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार शहारे व त्यांच्या पथकाने या माहितीच्या आधारे परिसरात सापळा रचला. यावेळी मारुती सुझुकी कंपनीचे सोनेरी रंगाचे वाहन (क्रमांक MH 04 DB 8749) संशयास्पद रितीने येताना दिसले. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

जनावरांना दिली जात होती क्रूर वागणूक पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात २ पांढऱ्या रंगाच्या गाई आणि ३ पांढऱ्या रंगाचे गोऱ्हे असे एकूण ५ जनावरे मिळून आली. या जनावरांना कोणताही चारा किंवा पाण्याची सोय न करता, अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयतेने दोरीने बांधून कत्तलीसाठी नेले जात होते. नियमानुसार प्रत्येक जनावरासाठी ठराविक जागा असणे बंधनकारक असताना, या वाहनात जनावरांना अक्षरशः कोंबण्यात आले होते.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: १) मारुती सुझुकी चारचाकी वाहन (किंमत ३,००,०००/- रुपये) २) ५ जनावरे (किंमत ६०,०००/- रुपये) एकूण मुद्देमाल: ३,६०,०००/- रुपये  या प्रकरणी फरार आरोपी चालकाविरुद्ध अप. क्र. २६४/२०२६, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ), (ड), (ई), (ह), (फ) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), (ब), ९ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शहारे व वरठी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.