– धान बोनसवरून रोहित पवारांचा परिणय फुके यांच्यावर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारला घेरण्याचा इशारा
पंकज परशुरामकर, नवेगावबांध :- अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धान बोनसच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी महायुती सरकारसह भाजप नेते परिणय फुके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “फडणवीसांनी अभ्यासासाठी छत्तीसगडला पाठवले, पण तेथील अभ्यासात सर्वात मंद विद्यार्थी कोण ठरले, हे आता दिसून येत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
अर्जुनी मोरगाव येथील कार्यक्रमाला जात असताना सोमवारी रोहित पवार यांनी नवेगावबांध येथील ग्रीन पार्कला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस आणि चांगला दर देण्याची आश्वासने देण्यात आली; मात्र सत्ता मिळाल्यानंतर सरकार या आश्वासनांपासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
धान बोनस हा शेतकऱ्यांच्या घामाचा हक्क आहे. सरकारने तातडीने बोनस जाहीर करावा, अशी मागणी करत रोहित पवार यांनी बोनसबाबत निर्णय न घेतल्यास महायुती सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने रोहित पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल दर, धान बोनस, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम, तातडीने विद्युत कनेक्शन तसेच स्वतःच्या मोबाईलवरून ई-पिक पाहणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक संचालक गंगाधर परशुरामकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर, अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, जिल्हाध्यक्ष मिथुन मेश्राम, गुड्डू बोपचे, चरण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत रोहित पवार यांनी “या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडून सभागृहाच्या आत आणि बाहेरही सरकारला जाब विचारू. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील,” असे आश्वासन दिले. त्यामुळे धान बोनस, हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांवरून आगामी काळात सरकारविरोधातील आंदोलनाला धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





