Monday, March 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

अर्जुनी-मोरगाव ते बोरी मार्गाच्या रस्ते विकासात भर केव्हा पडणार? नागरिकांचा सवाल

यासीन शेख, गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी-मोरगाव–निलज–मालकनपुर–माहुकुडा ते बोरी या सुमारे २८ किलोमीटर अंतराच्या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्याच्या डांबरीकरणासह गड्डे बुजविण्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी सुमारे २७ ते २८ लाख रुपये खर्च करून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेशीम कापगते यांनी त्या वेळी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतर काही प्रमाणात गड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते.

मात्र यावर्षी पुन्हा या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. काही ठिकाणी एसटी बस व शालेय बसलाही या मार्गावरून प्रवास करताना अडचणी निर्माण होत आहेत. अर्जुनी-मोरगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने महागाव, बोरी, निलज, माहुकुडा परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज या मार्गाने प्रवास करतात. खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे.

या संदर्भात अनेक जनप्रतिनिधींना विचारणा करण्यात आली असता या रस्त्याच्या कामाबाबत ठोस भूमिका समोर येत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काही लोकप्रतिनिधींनी अद्याप प्रतिसाद दिलेला नसल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या मार्गाच्या कायमस्वरूपी विकासासाठी हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) वर्ग करण्याचा प्रस्तावही मंत्रालयात पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते.

या प्रस्तावाला मंजुरी मिळवून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार राजकुमार बडोले यांच्यावर असल्याने ते या कामाला केव्हा गती देतात, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. समाजसेवकांनी या रस्त्याची गंभीर परिस्थिती संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनासही आणून दिली आहे.

तथापि, काम कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंजूर निधीचा योग्य वापर करून दर्जेदार काम करण्यात यावे, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

जर लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरू झाले नाही, तर परिसरातील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी दिला आहे. त्यामुळे जनप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून अर्जुनी-मोरगाव ते बोरी–महागाव मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com