spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको : माजी आमदार चरण वाघमारे यांचा इशारा

– मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसींच्या अधिकारांशी तडजोड खपवून घेणार नाही

हंसराज,भंडारा :- मराठा समाजाच्या मागण्यांवर कायदेशीर व घटनात्मक मार्गाने तोडगा काढण्यास आमचा मुळीच विरोध नाही. मात्र, या निर्णयामुळे जर भविष्यात ओबीसी आरक्षणावर गदा येणार असेल, तर ओबीसी समाज कोणतीही तडजोड कदापि सहन करणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ओबीसी समाजात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षाची व समाजाची भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा केला जात आहे; परंतु या तडजोडीत ओबीसी समाजाच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची स्पष्ट व ठोस भूमिका राज्य सरकारने जाहीर करावी, अशी आग्रही मागणी वाघमारे यांनी केली.

आरक्षण हा कोणाचा उपकार नाही

पुढे बोलताना चरण वाघमारे म्हणाले की, “ओबीसी आरक्षण हा कोणाच्या उपकाराचा किंवा दयेचा विषय नसून, तो संविधानाने दिलेला सामाजिक न्यायाचा मूलभूत अधिकार आहे. एका समाजाला न्याय देण्याच्या नादात दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ओबीसी समाजाच्या सर्वपक्षीय प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करावी आणि आरक्षणाच्या संरक्षणाबाबत आपली कायदेशीर भूमिका स्पष्ट करावी.”

शासनाने जर ओबीसींच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून आरक्षणाला धक्का लावला, तर संपूर्ण राज्यात लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शेवटपर्यंत ठाम लढा दिला जाईल, असा निर्वाणीचा इशाराही माजी आमदार चरण वाघमारे यांनी या वेळी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.