नागपूर :- राज्यावरील अवकाळी संकट अजूनही टळलेले नाही. सोमवारी वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. तर आज मंगळवारी देखील राज्यातील अनेक भागात ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अवकाळीचा कहर
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला असून आज दुसऱ्या दिवशी देखील राज्यातील १८ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील २४ तास धोक्याचे असणार आहेत. यावेळी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यालाच खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट”
पश्चिम महाराष्ट्रात ३१ मार्चला अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांना अवकाळी तडाखा बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगराला वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून गारपीटही होऊ शकते. या जिल्ह्यांना देखील ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण विभागातील मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ असेल. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवला ‘येलो अलर्ट’ असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाण्याला अवकाळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
विदर्भात उन्हाचा आणि पावसाचाही तडाखा
विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिममध्ये उष्ण हवामान राहील. तर भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आणि वर्ध्याला अवकाळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ असेल. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विजांचा धोका अधिक राहणार आहे.
शेतकरी आणि नागरिकांना इशारा
मंगळवारी ३१ मार्चला राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा जोर राहणार असून गारपिटीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.