spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई :- दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. दहिसर (मुंबई) नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दहिसर नदी परिसरातील गोठ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने संबंधित नकाशा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. गोठे हलविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले असून, नोटिस देऊन स्थलांतराची कारवाई सुरू आहे.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी, मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत कोणती कारवाई केली, याची माहिती सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, मंडळाने त्वरित जबाबदारी घ्यावी आणि एका आठवड्यात अहवाल सादर करावा.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली की, दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि वालभट नद्या यांचे पुनरुज्जीवन कार्य सुरू आहे. दहिसर नदीसाठी दोन मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम पूर्ण झाले असून प्रकल्प ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल. पोयसर नदीसाठी १० मलजल प्रक्रिया केंद्रांपैकी नऊ केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. ओशिवरा आणि वालभट नदीसाठी पाच प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून तीही प्रगतीपथावर आहेत.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, नदीकिनारी असलेल्या गोठ्यांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तथापि, अनेक गोठ्यांची नोंदणी अद्याप न झाल्याने कारवाईत विलंब होत आहे. दहिसर नदी प्रकल्पात १३०, पोयसरमध्ये २,५५४ आणि ओशिवरा नदी प्रकल्पात ७०० घरे व दुकाने बाधित असून, पात्र बांधकामांच्या पर्यायी सदनिकांअभावी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.