– सुरक्षा फलकावर लक्ष द्या ठाणेदार किशोर भुजाडे
खापा, वार्ताहर :- वाकी येथील कन्हान नदी डोहात बुडून नागपूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२२) दुपारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
सचिन शिवचरण साहू (वय २६, मानकापूर किराडले लेआउट, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. माहितीनुसार सचिन हा नागपूरवरून आपल्या भाऊ आणि मित्रांसह वाकी येथील ताजुद्दिन बाबांच्या दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. वाकी दरबारात पूजा-अर्चना करून दर्शन घेतल्यानंतर कन्हान नदीवर फिरायला गेले. कन्हान नदीवर गेल्यावर पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. पाण्याचा अंदाज आला नसल्याने सचिन गटांगळ्या खात खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केला. पण त्याची काही मदत करण्याआधीच तो खोल पाण्याच्या डोहात बुडाला.

त्याच्यासोबत आलेले भाऊ व मित्र बचावले गेले.
घटनेची माहिती त्वरीत खापा पोलिसांना देण्यात आली. खापा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक गोताखोरांच्या मदतीने सचिन पाण्यात शोध घेणे सुरू केले. अवघ्या एक तासात मृतदेह शोधून काढण्यात यश आले.
खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात ए एस आय विनोद पाटील, प्रकाश नांदूरकर यांनी प्राथमिक तपास व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास खापा पोलिस करीत आहेत.
वाकीवूड परिसरात सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे खाप्याचे तत्कालीन ठाणेदार मनोज खडसे यांनी परिसरात सूचना फलकही लावले आहेत. परंतु, या फलकाकडे दुर्लक्ष करीत अनेक तरूण नदीत पोहायला उतरतात. आपले जीव गमावून बसतात. नदी काठावरील खडकांवर लिहिलेल्या सूचनांचे तरुणांनी पालन करावे व आपला उगाच जीव गमावून बसु नये. नदीपत्रात उतरून नये असे, आव्हान यावेळी खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केले.




