spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागेच्या जुन्या वादातून तरुणावर झोपेत ब्लेडने जीवघेणा हल्ला; सिहोरा पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

हंसराज,भंडारा तुमसर :- जागेच्या जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर तो झोपेत असताना ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील हरदोली येथे घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात सिहोरा पोलिसांना यश आले असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी राजू बन्सीलाल राऊत (वय २४, रा. हरदोली) हा १७ एप्रिल २०२६ च्या रात्री आपल्या मोठ्या वडिलांच्या (रतन राऊत) अंगणात खाटेवर झोपला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात इसमांनी राजूच्या अंगावर असलेले कंबल त्याच्या डोक्यावर ओढले आणि काही कळण्याच्या आत त्याच्या गळ्यावर व गालावर ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. राजूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दोन अज्ञात इसम गावात पळताना दिसले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या राजूला तातडीने तुमसर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांसमोर होते मोठे आव्हान याप्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला जखमी किंवा प्रत्यक्षदर्शींकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. अनेक संशयितांची चौकशी करूनही तपासात अडथळे येत होते. मात्र, पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तांत्रिक तपासातून गुन्ह्याची उकल सिहोरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, घराच्या जागेवरून फिर्यादीचा जुना वाद असल्याचे समोर आले. याच वादातून शैलेश चरण राऊत (वय ३८, रा. हरदोली) आणि कुणाल रामू राऊत (वय ३०, रा. हिंगणा रोड, नागपूर) यांनी हा कट रचून हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. २४ मे २०२६ रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा ठाणेदार विजय कसोधन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय कसोधन करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.