– मनपाच्या विशेष मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मालमत्ता कर वसुली मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनपाने सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत आजवर (ता.२५) रू.११ कोटींची वसुली करण्यात आली आहे. मंगळवारी मनपाच्या दहाही झोन मध्ये १.५८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात व मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., आणि मिलिंद मेश्राम करीत असून, मोहिमेअंतर्गत 1 हजार कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन समिती सभापती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
मनपाच्या दहाही झोनमधील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीच्या मोहिमेला सुरूवात झाली असून, मोहिमेचे चांगले परिणाम बघायला मिळत आहे. प्रत्येक झोन मध्ये थकीत मालमत्ता कर धारकांकडे मनपाचे कर संग्राहक जाऊन थकीत रकमेची वसुली करीत आहे. ही मोहीम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.





