spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

काटोलमध्ये डंपिंग साइट खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

 

काटोल २७ : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. काटोल नगर परिषदेच्या कचरा डंपिंग साइटवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काटोल येथील खानगाव पारधी बेडा येथे घडली.

विराट राणा पवार असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नगर परिषदेने पारधी बेड्याच्या मागील भागात कचरा डंपिंगसाठी मोठे खड्डे खोदले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, ज्यामुळे हा धोका निर्माण झाला होता. विराट सकाळी खेळत असताना या खड्ड्यात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याची आई माधुरी राणा पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक पारधी समाजातील सदस्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे बुजवून डंपिंग साइट दुसरीकडे हलवण्याची मागणी ते करत आहेत. या संदर्भात आमदार, मंत्री, तहसीलदार आणि संबंधित विभागांना अनेक निवेदनेही देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. “या दुर्घटनेत आमच्या समाजातील एका निष्पाप मुलाचा बळी गेला आहे. हे धोकादायक खड्डे त्वरित बुजवावेत आणि कचरा डंपिंग कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी पीडित कुटुंबीय आणि स्थानिक लोकांनी केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिवासी पारधी समाजाने केली आहे. नगर परिषद आणि डंपिंग कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.